‘येलो मोझॅक’मुळे सोयाबीन धोक्यात
By admin | Published: September 7, 2015 02:08 AM2015-09-07T02:08:42+5:302015-09-07T02:08:42+5:30
प्रारंभी बऱ्यापैकी आलेल्या पावसाने सध्या डोळे वटारले आहे. पिकांची स्थिती समाधानकारक असली तरी पाऊस नसल्याने सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
पीक विम्याच्या लाभावरही प्रश्नचिन्ह : शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळण्याची शक्यता
वर्धा : प्रारंभी बऱ्यापैकी आलेल्या पावसाने सध्या डोळे वटारले आहे. पिकांची स्थिती समाधानकारक असली तरी पाऊस नसल्याने सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पिकांना पाणी देण्याची तजविज केली जात आहे. असे असले तरी ओलिताची सोय नसलेल्या शेतकऱ्यांना मात्र पावसाचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जुलै महिन्यात पिकांच्या हिशेबाने समाधानकारक पाऊस आला. त्यानंतर आॅगस्ट महिन्यातही कुठे अतिवृष्टी तर कुठे संततधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले; पण पिकांचे चांगले पोषण झाले. यामुळे शेतकऱ्यांना हायसे वाटले होते. जिल्ह्यात कपाशी आणि सोयाबीन ही दोन मुख्य पिके असून दोन्ही पिकांना सध्या पावसाची नितांत गरज आहे. कपाशीला आणखी काही दिवस पाऊस नसला तरी चालेल; पण सोयाबीन पीक सध्या शेंगांवर आले आहे. आता सोयाबीन पिकाला जगविण्याकरिता पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. पाऊस न आल्यास सोयाबीन पिकाचे गतवर्षीप्रमाणेच हाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाही तर बहरलेले पीक उपयोगाचे राहणार नाही, अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करताना दिसतात.
गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांना अनियमित पावसाचा फटका बसत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी पावसाची दडी यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडेणासी झाली आहे. यंदा समाधानकारक पाऊस येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला. प्रारंभी पिकांसाठी पोषक ठरेल, असा पाऊसही आला; पण गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे सोयाबीन पिकांनी माना टाकल्याचे दिसून येत आहे. शेंगांवर आलेल्या सोयाबीन पिकांपासून उत्पन्न घेण्याकरिता पावसाची गरज आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
तळेगाव परिसरात पाच हजार हेक्टरमधील सोयाबीन धोक्यात
तळेगाव (श्या.पं.) - अनियमित पावसाने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. सोयाबीन पीक शेंगांवर आले आहे; पण रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने आष्टी तालुक्यात पाच हजारांवर हेक्टरमधील सोयाबीनचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्रफळ १२ हजार हेक्टरच्या वर आहे. २२ दिवसांच्या उघाडीनंतर आलेल्या पावसाने सोयाबीन उत्पादक काही प्रमाणात सुखावले होते; पण आता ‘येलो मोझॅक’ या रोगामुळे पाने पिवळी पडून झाड वाळत आहे. हा अत्यंत घातक असा पिकांचा कॅन्सर मानला जातो.
पाऊस नसल्याने या रोगावर फवारणीचा परिणाम होत नाही. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीनला शेंगा येत नाही व याचा संसर्गजन्य आजारासारखा फैलाव होतो. या रोगाचा सर्वाधिक परिणाम देवगाव, जुनोना, भिष्णूर, भारसवाडा, धाडी आदी गावांत अधिक दिसतो. याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार व कृषी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार कृषी विभागाने दौरा करून पिकांची पाहणी केली. फवारणीचा सल्ला दिला; पण शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च व्यर्थ गेला.
या रोगावर फवारणीचा कुठलाही उपयोग झाला नाही. अद्याप पाहणीचा अहवालही शासनाकडे पोहोचला नाही. कृषी विभागाने सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सोयाबीन उत्पादक करीत आहे.
पिकांवरील किडरोग हा नैसर्गिक आपत्तीच्या लाभात बसत नसल्याची नोंद शासन निर्णयात करण्यात आली आहे. यामुळे याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. पीक विम्याच्या लाभाबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विम्याचा लाभ हा पिकांच्या सरासरी उत्पादनावर मिळत असतो. त्या निष्कर्षात सोयाबीन बसले तर लाभ मिळेल, अन्यथा शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागणार आहे. सोयाबीन हातचे गेल्यास शेतकऱ्यांवर अधिकच मोठे संकट कोसळणार आहे.
यामुळे कृषी विभागाने त्वरित कारवाई करीत शेतकऱ्यांना उपाययोजना सूचवाव्या, अशी मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर)
रोहणा परिसरातही पिके धोक्यात
रोहणा - मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील धनोडी, वडगाव, दिघी, सायखेडा, बोदड व बोथली या गावांतील सोयाबीन, ज्वारी, तूर ही पिके सुकायला लागली आहेत. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा दुष्काळाच्या गर्देत सापडल्याचे दिसते.
पावसाच्या अत्यंत अनियमित आगमनामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. किमान पावसाळ्यात तरी पाऊस सर्वत्र येईल, ही अपेक्षा दुरापास्त झाली आहे. ३१ आॅगस्ट रोजी रोहणा परिसरातील उत्तरेकडे पाऊस कोसळला तर पूर्व पश्चिम व दक्षिण भागातील गावांत थेंबही पडला नाही. परिणामी, रोहण्याच्या उपरोक्त तीनही दिशेला असलेल्या धनोडी, वडगाव, दिघी, सायखेडा, बोदड, बोथली या गावांतील शेतीला १५ दिवसांपेक्षा अधिक दिवस पावसाची ओढ पडली आहे. पाऊस न येणे व पावसाळ्यात ३५ अंश सेल्शीयसपेक्षा अधिक तापमानाची नोंद, या दुहेरी कात्रीत पिके अडकली आहे. यामुळे सोयाबीन हे पीक सुकायला लागले आहे.
सोयाबीन सध्या शेंगा भरण्याच्या बेतात आहे. यावेळी सोयाबीनला पावसाची गरज असते. पुन्हा काही दिवस पाऊस आला नाही तर सोयाबीनच्या शेंगातील दाणे भरणार नाही. यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही अनेकांना सोयाबीनची कापणी करणेच परवडणारे राहणार नाही. तूर, ज्वारी ही पिकेदेखील सुकू लागली आहेत. कापसाची झाडे तेवढी तग धरून आहेत. बदलेत वातावरण लक्षात घेता येत्या काही दिवसांत चांगला पाऊस येईल, अशी कुठलीही लक्षणे दिसत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. एकंदरीत दुष्काळाचा फेरा शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याचेच दिसते.(वार्ताहर)