सोयाबीनची चाळणी
By Admin | Published: October 3, 2014 02:04 AM2014-10-03T02:04:56+5:302014-10-03T02:04:56+5:30
जिल्ह्यात सोयाबीनवर लष्करी अळीने हल्ला चढविला असून यात सेवाग्राम परिसरात शेतातील सोयाबीनची अक्षरश: चाळणी झाली आहे.
सेवाग्राम : जिल्ह्यात सोयाबीनवर लष्करी अळीने हल्ला चढविला असून यात सेवाग्राम परिसरात शेतातील सोयाबीनची अक्षरश: चाळणी झाली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे उत्पन्न होण्याबाबत शंका वर्तविली आहे. पिकावर अळीने हल्ला चढविला असून याबाबत कृषी विभागाकडून मात्र मार्गदर्शन मिळत नाही. यातून कसे वाचावे असा नवा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
पावसाच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांचे या हंगामातील पूर्ण गणितच बिघडले आहे. त्याच्या पेरण्याच्या काळापासून तर उत्पन्न निघण्याच्या काळात पूर्ण बदल झाला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर होत असलेली कापसाची खरेदी तर केव्हाची बाद झाली आहे. यंदा तर कापूस निघण्याचे संकेतही दिसत नाहीत. कपाशीला मिळत असलेल्या अत्यल्प दारामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनला आपली पसंती दर्शविली असून जिल्ह्यात सोयाबीनचचा पेरा वाढत आहे; मात्र यंदाच्या हंगामात सोयाबीनवर अनेक किड्यांनी हल्ला चढविला आहे. यात लष्करी अळीने केलेल्या हल्ल्यात सोयाबीनचे उत्पन्न होणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सेवाग्राम येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीनच्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनची पुरती चाळणी झाली आहे. यामुळे शेतकऱ्याने शेताकडे जाण्याचेही टाळले आहे. यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीनचे उत्पादन मिळण्याची कुठलीही आशा शिल्लक राहिली नसल्याचे शेतकरी बोलत आहेत. या संकटातून मार्ग कसा काढावा या विवंचनेत जिल्ह्यातील शेतकरी आहे.(वार्ताहर)