ढेपीसाेबतच सोयाबीननेही खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 12:02 PM2021-07-29T12:02:13+5:302021-07-29T12:05:28+5:30

Wardha News जगभरात सोयाबीनची टंचाई निर्माण झाली आहे. ढेपीकरिता मागणी वाढल्याने सोयाबीननेही चांगलाच भाव खाल्ला आहे.

Soybeans prices on high | ढेपीसाेबतच सोयाबीननेही खाल्ला भाव

ढेपीसाेबतच सोयाबीननेही खाल्ला भाव

googlenewsNext
ठळक मुद्देजागतिक बाजारात तेजी सोयाबीनचे दर दहा हजारांच्या उंबरठ्यावर

महेश सायखेडे

 लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : गेल्या हंगामात जगात सोयाबीनची नापिकीच राहिली. त्यामुळे जगभरात सोयाबीनची टंचाई निर्माण झाली आहे. ढेपीकरिता मागणी वाढल्याने सोयाबीननेही चांगलाच भाव खाल्ला आहे. सध्या बाजारपेठेत ८ हजार रुपयांपासून ९ हजार ६०० रुपयांपर्यंत भाव वधारले असून यात शेतकऱ्यांना किती फायदा होईल, यावर मात्र प्रश्नचिन्हच दिसून येत आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत नॉन जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्ग्यानिझम (जीएमओ) पद्धतीच्या सोयाबीन ढेपीची मागणी वाढल्याने सोयाबीनच्या तुटवड्यामुळे दरातही वाढ झाली आहे.

वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. असे असले तरी हे साेयाबीन जेनेटिकली मॉडिफाईड नाही. मागील हंगामात सोयाबीन पीक अंतिम टप्प्यात असताना परतीच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादकांना चांगलाच फटका बसला. त्यावेळी सुरुवातीला सोयाबीनला प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार रुपये भाव मिळाला. आता अचानक जागतिक बाजारपेठेत नॉन जीएमओ सोयाबीनच्या ढेपीचे भाव वधारले आहेत. त्यामुळेच सोयाबीनच्या भावातही तेजी आली असून सध्या तुरी पेक्षा जास्त भाव मिळत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगणघाट बाजारपेठेत बुधवारी तुरीला प्रतिक्विंटल ५ हजार ६०० ते ६ हजार ४६५ रुपये भाव मिळाला. तर सोयाबीनला प्रतिक्विंटल ८ हजार ते ९ हजार ६८० रुपये भाव देण्यात आला. सोयाबीनची ही भाववाढ पाहून शेतकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मागील हंगामात जगात सोयाबीनची नापिकी राहिली. त्यामुळे नॉन जीएमओ सोयाबीनच्या ढेपीचे दर वाढले आहे. त्याचा परिणाम सोयाबीनच्या भावावर पडल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनच्या भावात नॉन जीएमओ ढेपीच्या दरवाढीमुळेच तेजी आली आहे. पण, ही तेजी किती दिवस कायम राहते, यावर ही भाववाढ अवलंबून राहील.

- विजय जावंधिया, कृषी तज्ज्ञ वर्धा.

Web Title: Soybeans prices on high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती