कोरोना संकटात मुखाग्नीसाठी मिळेना स्मशानशेडमध्ये जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 05:00 AM2020-09-20T05:00:00+5:302020-09-20T05:00:02+5:30
एका सामाजिक संघटनेने सुमारे चार वर्षांपूर्वी दोन शवदाहिनी यंत्र वर्धा शहरातील स्मशानभूमित लावले. शिवाय त्याची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी वर्धा नगरपालिकेकडे देण्यात आली. पण जिल्ह्यावर कोरोना संकट ओढावण्यापूर्वीच या यंत्रात तांत्रिक बिघाड आला. मात्र, तो दूर करण्याकडे पालिकेतील लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली. परिणामी हे यंत्र सध्या पांढरा हत्ती ठरू पाहत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात दोन कोविड रुग्णालय असून ते सध्या वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरत आहे. असे असले तरी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर वर्धा शहरातील स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र, तेथील स्मशानशेड कोविड बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी कमी पडत असल्याने म्हसाळा आणि सावंगी (मेघे) येथे पर्याय शोधल्या जात असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
एका सामाजिक संघटनेने सुमारे चार वर्षांपूर्वी दोन शवदाहिनी यंत्र वर्धा शहरातील स्मशानभूमित लावले. शिवाय त्याची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी वर्धा नगरपालिकेकडे देण्यात आली. पण जिल्ह्यावर कोरोना संकट ओढावण्यापूर्वीच या यंत्रात तांत्रिक बिघाड आला. मात्र, तो दूर करण्याकडे पालिकेतील लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली. परिणामी हे यंत्र सध्या पांढरा हत्ती ठरू पाहत आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या कोविड बाधिताला वर्धा शहरातील स्मशानभूमित आणून त्यांच्यावर शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन अंत्यसंस्कार केले जातात. इतकेच नव्हे तर या ठिकाणी अन्य मृतकांनाही अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. पण सध्या या स्मशानभूमित कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानशेड कमी पडत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून सध्या कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पर्यायी जागा शोधली जात आहे. लवकरच जागा निश्चित केली जाणार आहे.
सेवाग्राम किंवा म्हसाळ्यात होणार अंत्यविधी
सेवाग्राम येथील कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या कोरोना बाधितावर सेवाग्राम किंवा नजीकच्या म्हसाळा येथे अंत्यसंस्कार करण्याचे तालुका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी तहसीलदारांनी या दोन ठिकाणच्या स्मशानभूमिची पाहणी केली. लवकरच या विषयी ठोस निर्णय होणार आहेत.
सावंगीच्या रुग्णालयात मृत्यू झालेल्यावर होणार सावंगीतच अंत्यसंस्कार
एखाद्या कोरोना बाधिताचा सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात मृत्यू झाल्यास त्याच्यावर सावंगी (मेघे) शिवारातच कसे अंत्यसंस्कार करण्यात येईल, याविषयी सध्या अधिकाºयांकडून रणनीती आखल्या जात आहे. चर्चेअंती लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
तहसीलदारांनी केली पाहणी
वर्धा शहरातील स्मशानभूमित कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशान शेड कमी पडत असल्याचे लक्षात आल्याने तहसीलदार प्रिती डुडुलकर यांनी शनिवारी सेवाग्राम, म्हसाळा तसेच सावंगी (मेघे) येथील स्मशानभूमिची पाहणी केली.