स्पेनच्या विशेषज्ञांनी दिले विदर्भातील संत्रा उत्पादकांना धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 02:54 PM2018-10-06T14:54:01+5:302018-10-06T14:55:52+5:30
स्पेन येथील जागतिक किर्तीचे संत्रा विशेषज्ञ विदर्भातील शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध संत्रा उत्पादनासाठी मार्गदर्शन करीत आहेत. याबाबत नुकतीच येथे तीन दिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला विदर्भातील संत्रा उत्पादकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्पेन येथील जागतिक किर्तीचे संत्रा विशेषज्ञ विदर्भातील शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध संत्रा उत्पादनासाठी मार्गदर्शन करीत आहेत. याबाबत नुकतीच येथे तीन दिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला विदर्भातील संत्रा उत्पादकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
स्पेन येथून रेमॉन नेव्हीया व त्यांचे सहकारी बेया व शाव यांनी विदर्भातील काटोल, शेंदुरजना (घाट) येथे कार्यशाळा घेतल्या. यातून तंत्रशुद्ध उत्पादनाचे मार्गदर्शन करण्यात आले. स्पेनमध्ये संत्र्याची उत्पादकता प्रति हेक्टर ६० ते ८० टन असून फळाची प्रत उत्कृष्ट आहे. त्यांचा १२ लाख टन संत्रा इतर देशात निर्यात होतो. फळ परिपक्व होईपर्यंत त्याची काळजी कशी घ्यायची, उत्पादन वाढीसाठी खत, पाणी व सुक्ष्मद्रव्याचे नियोजन कसे करावे, याबाबत स्पेनच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. विदर्भातील जमीन ही स्पेन पेक्षा अधिक चांगली असून माती परिक्षणासोबत संत्रा पिकासाठी पाण्याचे परीक्षण महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. स्पेनमध्ये शेतीसाठी पाणी विकत घ्यावे लागते. छाटणीकरिता शेतकऱ्यांना ८०० रू. द्यावे लागतात. विदर्भात छाटणी योग्यप्रकारे होत नसल्यामुळे उत्पादन कमी होऊन प्रत चांगली मिळत नाही, असा अभिप्राय स्पेनच्या तज्ज्ञांनी नोंदविला आहे. कार्यशाळेला १२०० शेतकऱ्यांची उपस्थिती होती. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता पंचभाई यांनीही मार्गदर्शन केले.
संत्रा उत्पादकता वाढविणे व प्रत सुधारण्याची गरज आहे. देशातील व देशाबाहेरील संत्रा मार्केट मोठे असून चांगल्याप्रतीच्या संत्र्याला दर मिळतो. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने व सहकार्याने संत्रा उत्पादकांकरिता केले आहे.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक महाआॅरेंज