विशेष मुलाखत; जिल्ह्यासह देशातील घराणेशाहीला संपविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:18 PM2019-05-23T22:18:56+5:302019-05-23T22:23:47+5:30
देशातील मतदार जागरूक आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी देशातील राजकारणात अनेक वर्षांपासून सुरू असलेली घराणेशाहीच संपविण्याचे काम हाती घेतले असल्याचे या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते, असे भाजपचे विजयी उमेदवार रामदास तडस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
महेश सायखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशातील मतदार जागरूक आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी देशातील राजकारणात अनेक वर्षांपासून सुरू असलेली घराणेशाहीच संपविण्याचे काम हाती घेतले असल्याचे या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते, असे भाजपचे विजयी उमेदवार रामदास तडस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
प्रश्न : विजयाबाबत तुम्ही काय सांगाल?
२०१४ मध्ये फार मोठ्या मताधिक्याने जनतेने मला विजयी केले. त्यानंतर पाच वर्षांत ५५ वर्षांत झाला नाही असा वर्धा लोकसभा क्षेत्रात विकास करण्याचा प्रयत्न झाला. त्यालाच मतदारांनी पसंती देत मला दुसऱ्यांदा संधी दिली आहे.
प्रश्न : नव्याने खासदार म्हणून काम करताना कुठल्या कामांना प्राधान्य द्याल?
उत्तर : काही प्रश्न अजूनही कायम आहेत. त्यात सिंचनाची समस्या मोठी आहे. माझ्या मतदारसंघातील काही सिंचन प्रकल्प काँग्रेसच्या कार्यकाळात वेळीच पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु, तसे झाले नाही. शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी आपण सिंचनाचा प्रश्न कसा सोडविता येईल यावर लक्ष केंद्रित करू.
प्रश्न : कुठले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल?
वरूडचा पंढरी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास न केल्याने व तेथे ड्राय झोनच्या नावाखाली बोअरवेल करू दिल्या जात नाहीत. त्यामुळे बाजारपेठ असताना तेथे संत्राचे उत्पादन शेतकºयांना घेता येत नाही. त्यामुळे वरुडचा पंढरी प्रकल्प, लोअर वर्धा, अप्पर वर्धा, आजनसरा तसेच पोथरा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू.