विशेष पालक संपर्क अभियान
By admin | Published: April 23, 2015 01:46 AM2015-04-23T01:46:46+5:302015-04-23T01:46:46+5:30
दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे.
वर्धा : दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्यामुळे ही संख्या वाढविण्यासाठी तसेच पालकांना इतर शाळेत मुलांना टाकण्यास परावृत्त करण्यासाठी जि. प. च्या वतीने २४ एप्रिल ते २ मे २०१५ या कालावधीत विशेष पालक संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध आहे. तसेच उच्च विद्याविभुषित शिक्षक वर्गही कार्यरत आहे. जवळ पास ३० टक्के शाळांमध्ये ई-लर्निंग प्रकल्प सुरू आहे. १०० टक्के शाळांमधून गणित व विज्ञान हे विषय सेमी इंग्रजी माध्यमातून शिकविले जातात. अनेक होतकरून शिक्षक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल शाळा निर्माण करीत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जवळपास ८० टक्के आहे. १४ वर्षाखालील वयोगटामधील राज्यस्तरीय संघात जास्तीत जास्त विद्यार्थी हे जिल्हा परिषदेचेच आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांची संनियंत्रण तपासणी व मार्गदर्शन करण्याकरिता अनुभवी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांची सक्षम पर्यवेक्षीय यंत्रणा कार्यरत आहे. याचबरोबरच भौतिक व तांत्रिक सर्व सोयी उपलब्ध असताना ही जिल्हा परिषद शाळांचे यश समाजासमोर योग्य पद्धतीने मांडल्या जात नसल्याने दिवसेंदिवस पटसंख्या घटत असल्याचे दिसून येते.
या सर्व बाबी विचारात घेता शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये सर्व जिल्हा परिषद शाळांची एकूण पटसंख्या १० टक्के वाढविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विशेष पालक संपर्क अभियान २४ एप्रिल ते २ मे २०१५ या कालावधीत राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत जि. प. शाळांच्या शिक्षकांनी पालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या सर्व सुविधांबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंत्रणेच्या सर्व घटकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन जि. प. चे शिक्षण व आरोप्ग्य सभापती मिलिंद भेंडे आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.(शहर प्रतिनिधी)