लाखो रुपये खर्चूनही हिरव्या स्वप्नांचा चुराडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:47 PM2019-03-09T23:47:35+5:302019-03-09T23:48:29+5:30
शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत राज्यात सर्वत्र वृक्षलागवड करण्यात आली. या योजनेअंतर्गत लावलेली झाडे संबंधित ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे अखेरच्या घटका मोजत असून अनेक झाडे वाळलेली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत राज्यात सर्वत्र वृक्षलागवड करण्यात आली. या योजनेअंतर्गत लावलेली झाडे संबंधित ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे अखेरच्या घटका मोजत असून अनेक झाडे वाळलेली आहेत.
विरुळ व हुसेनपूर ग्रामपंचायतीअंतर्गत पावसाळ्यात लाखो रुपये खर्च करून मोकळ्या जागेवर झाडे लावण्यात आली. या झाडांच्या संगोपनासाठी चार ते पाच महिने मजुरांना ठेवण्यात आले, परंतु ऐन उन्हाळा लागताच झाडांचे संगोपन करणारे मजूर बंद केल्याने पंधरा दिवसातच झाडे वाळायला सुरुवात झाली. यामुळे लाखो रुपये खर्च करूनही हिरव्या स्वप्नाचा चुराडा झालेला आहे. याला स्थानिक ग्रामपंचायत जबाबदार असून कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
शासनाने प्रामाणिक हेतू ठेवून संपूर्ण राज्यभर प्रत्येक विभागामार्फत झाडे लावण्याचा मोठा निर्णय घेतला. यात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने झाडे जगवली, परंतु काही ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने झाडे वाळली आहेत. येथील भवानी वॉर्डातील तलावाजवळ ग्रामपंचायतीने हजारो झाडे लावलेली असताना मात्र निष्काळजीपणामुळे आज ही झाडे वाळत आहेत. हाच प्रकार हुसेनपूर ग्रामपंचायतीमध्येही दिसून आला, त्यामुळे यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेलेला असून संबंधित गटविकास अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा याला कारणीभूत ठरला आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काही सामाजिक व राजकीय संघटनांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. याकडे नव्यानेच रुजू झालेल्या मुख्य कार्यपालन अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी आहे.
वृक्षलागवड ठरली फोटोपुरती मर्यादित
विविध नावाखाली वृक्षलागवड योजनेची अंमलबजावणी केली जाते. वृक्षलागवड करताना फोटो सेशन करूनही प्रसिद्धीही मिळविली जाते. त्यानंतर झाडांच्या संगोपनाकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे वृक्षलागवड योजना अनेक ठिकाणी इव्हेंटच ठरली आहे.