स्वयंस्फूर्तीने पाळला ‘जनता कर्फ्यू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 05:00 AM2020-03-23T05:00:00+5:302020-03-23T05:00:08+5:30
जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने खासगी व राज्य परिवहन महामंडळाची बससेवा रविवारी बंद ठेवण्यात आली होती. शिवाय रेल्वेची प्रवास सेवा बंद होती. त्यामुळे खासगी बसेस रस्त्याच्या कडेला तर रापमची लालपरी आगारात जमा होती. शिवाय बसस्थानक निर्मनुष्य होती. रविवारी प्रत्येक नागरिकाने घरात राहून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड-१९ (कोरोना) या विषाणूला अटकाव घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढून जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. इतकेच नव्हे तर केवळ किराणा, भाजीपाला व मेडिकल्स शॉप या जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण रविवारी ‘जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने वर्धा शहरातील केवळ मेडिकल्स शॉपच उघडे होते. शिवाय औषधी विक्रेत्यांकडून ग्राहकांना हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने खासगी व राज्य परिवहन महामंडळाची बससेवा रविवारी बंद ठेवण्यात आली होती. शिवाय रेल्वेची प्रवास सेवा बंद होती. त्यामुळे खासगी बसेस रस्त्याच्या कडेला तर रापमची लालपरी आगारात जमा होती. शिवाय बसस्थानक निर्मनुष्य होती. रविवारी प्रत्येक नागरिकाने घरात राहून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी खडा पहारा दिली. शिवाय डॉक्टर आपातकालीन परिस्थितीशी दोनदोन हात करण्यासाठी सज्ज होते. पोलीस अधिकाऱ्यांकडून शहरात वेळोेवेळी गस्त घातली जात होती. तर चौकाचौकात कर्तव्यावर असलेल्या पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जो कुणी रस्त्यावर आला त्याला थांबवून समज दिली. शिवाय त्यांच्या वाहनांची तपासणी केली. एकूणच जनता कर्फ्यूच्या निमित्ताने रविवारी शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य होते. इतकेच नव्हे तर ठिकठिकाणी पोलिसांचा खडा पहारा होता. सूर्य मावळतीला जात असताना दुपारी ५ वाजता दिवसभर घरात थांबून असलेल्या नागरिकांनी घराच्या आवारात येत कोरोनाला हरविण्यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणेतील अधिकाऱ्यांप्रती टाळा वाजवून कृतज्ञता व्यक्त केली. आजच्या जनता कर्फ्यूमध्ये छोटे-मोठे व्यापारी, किरकोळ व्यावसायिक, शेतमजूर, शेतकरी आदींनी स्वयंस्पूर्तीने दिवसभर घरी राहून सहभाग नोंदविला. शिवाय राष्ट्रीय कार्यात आपले योगदान दिले. जनता कर्फ्यूच्या माध्यमातून वर्धेकरांनी गो कारोना गो चा संदेश दिला.
वर्धा : कोरोनाला हरवायचे आहे तर प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधानांच्या याच आवाहनाला वर्र्धेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रविवारी घरातच राहून ‘जनता कर्फ्यू’ पाळून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. इतकेच नव्हे, तर या ‘जनता कर्फ्यू’च्या माध्यमातून वर्र्धेकरांनी ‘गो कोरोना गो...’चा संदेश दिला. रविवारी नागरिकच घराबाहेर न पडल्याने नेहमी गर्दी राहणाºया ठिकाणी आज शुकशुकाट होता.
चौकांमध्ये स्मशानशांतता
वर्धा शहरातील बजाज चौक आणि आर्वी नाका चौक हे दोन्ही महत्त्वाचे परिसर आहेत. शिवाय येथे नेहमीच नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, ‘जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने रविवारी या दोन्ही ठिकाणी स्मशानशांतता होती. शिवाय रस्ते निर्मनुष्य होते.
फळविक्रेत्यांच्या हातगाड्या ‘हॉकर्स झोन’मध्ये जमा
जिल्ह्यात कलम १४४ लागू झाल्यानंतर रविवारी वर्धा जिल्ह्यात ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात आला. या कर्फ्यूच्या निमित्ताने हातगाड्यांवर जीवनावश्यक साहित्य विक्री करणाºयांनी रविवारी आपली दुकाने बंद ठेवली होती. शिवाय या छोट्या व्यावसायिकांनी आपल्या हातगाड्या ‘हॉकर्स झोन’मध्ये जमा केल्या होत्या.
पेट्रोलपंप राहिले बंद
नेहमी वाहनात इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोलपंपांवर नागरिकांची गर्दी राहते; पण रविवारी ‘जनता कर्फ्यू’दरम्यान वर्धा शहरातील बहुतांश पेट्रोलपंप बंद होते. त्यामुळे नेहमी वर्दळीचे ठिकाण असलेले पेट्रोलपंप आज निर्मनुष्य होते. एकूणच पेट्रोलपंप असोसिएशननेही ‘जनता कर्फ्यू’ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गप्पा, खेळ आणि टीव्हीच्या माध्यमातून केले मनोरंजन
जनता कर्फ्यूच्या निमित्ताने घरात राहिलेल्या व्यक्तींनी बच्चे व वयोवृद्धांसोबत विविध विषयांवर गप्पा मारल्या. इतकेच नव्हे, तर बच्चे कंपनीसोबत विविध खेळ आणि दूरचित्रवाहिनीवर चित्रपट आणि मालिका बघून मनोरंजन केले. दुपारी ५ वाजता यंत्रणेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
किराणा दुकानेही होती बंद
‘जनता कर्फ्यू’मध्ये शहरातील कापड व्यावसायिक, सराफा व्यावसायिक तसेच किराणा व्यावसायिक असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या व्यावसायिकांनी रविवारी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून घरीच राहून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.