स्वयंस्फूर्तपणे अन् शांततेत वर्धेकरांनी पाळला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:44 PM2019-02-16T23:44:23+5:302019-02-16T23:44:57+5:30
जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या जवानांमध्ये दोन जवान महाराष्ट्रातील असून दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा सध्या सर्वस्तरातून निषेध होत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी बंदची हाक देण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या जवानांमध्ये दोन जवान महाराष्ट्रातील असून दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा सध्या सर्वस्तरातून निषेध होत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी बंदची हाक देण्यात आली होती. याला वर्धेकरांनी स्वयंस्फूर्तपणे प्रतिसाद देत शांततेत बंद पाळला.
स्थानिक व्यापाºयांनी शनिवारी सकाळी एकत्र येत वर्धा शहरातून शहिदांच्या स्मरणार्थ मोर्चा काढला. मोर्चा कच्छी लाईन येथे पोहोचल्यावर तेथे पुलवामा येथील घटनेत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व्यापाºयांच्या मोर्चाने ‘अमर रहे शहीद, जवान अमर रहे’ अशा घोषणा देत वर्धा शहरातील प्रमुख मार्गाने क्रमण केले. शनिवारी वर्धा शहरातील कापड व्यावसायिक, सराफा, अनाज व्यावसायिक, कृषी व्यावसायिक, औषधी विक्रेता आदींनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. पुलवामा येथील घटनेचा बदला घेत, दहशतवाद्यांना मदत करणाºया पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी तात्काळ कठोर पाऊल उचला, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
कार्यालये सुरूच
शनिवारी बंदच्या हाकेला वर्धेकरांनी स्वयंस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. बहुतांश व्यापाºयांनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली. मात्र, विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालये सुरू होती. शिवाय रापमची बससेवाही सुरू राहिल्याने विविध कामानिमित्त संबंधित कार्यालयांमध्ये येणाºयांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही.
कापड व्यावसायिक पाठविणार शहिदांच्या परिवारांसाठी निधी
पुलवामा येथील घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना लोकवर्गणी करून निधी पाठविण्याचा मानस स्थानिक कापड व्यावसायिकांचा आहे. त्या अनुषंगाने वर्र्ध्यातील १५३ कपडा व्यावसायिक प्रत्येकी ५०० रुपये गोळा करून ती रक्कम सेंट्रल बँक आॅफ इंडियाने शहीद परिवारासाठी तयार केलेल्या बँक खात्यात जमा करणार आहेत. त्यानंतर ही रक्कम बँकेच्या सहकार्याने शहीद जवानांच्या कुटुंबीयांकडे वळती होणार असल्याचे टिबडीवाल यांनी सांगितले.