विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धेला क्रीडा ज्योत प्रज्वलनाने प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:37 PM2017-12-29T23:37:04+5:302017-12-29T23:37:15+5:30
स्थानिक नगर पालिकेद्वारे आयोजित पालकमंत्री चषक विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनपर कार्यक्रमापूर्वी शुक्रवारी सायंकाळी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून शहरातून रॅली काढण्यात आली. या क्रीडा ज्योत रॅलीला उपविभागीय महसूल अधिकारी स्मिता पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक नगर पालिकेद्वारे आयोजित पालकमंत्री चषक विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनपर कार्यक्रमापूर्वी शुक्रवारी सायंकाळी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून शहरातून रॅली काढण्यात आली. या क्रीडा ज्योत रॅलीला उपविभागीय महसूल अधिकारी स्मिता पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली.
जुन्या आरटीओ मैदानाच्या परिसरातून निघालेल्या क्रीडा ज्योत रॅलीने शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केले. रॅलीचा समारोप जुन्या आरटीओ मैदानाच्या परिसरात झाला. यानंतर खो-खो स्पर्धेचा उद्घाटनपर कार्यक्रम पार पडला. क्रीडा ज्योत रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, काही ज्येष्ठ खो-खो खेळाडू आदी उपस्थित होते. या खो-खो स्पर्धेत महिलांचे नऊ तर पुरूषांचे १२ असे एकूण २१ संघ सहभागी झाले आहेत. उद्घाटनपर सामना पुरूष गटात विदर्भ क्रीडा मंडळ काटोल विरूद्ध राजापेठ स्पोर्टिंग क्लब अमरावती आणि महिला गटात नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ विरूद्ध रामनगर स्पोर्टींग क्लब पुलई यांच्यात खेळण्यात आला.
चार सामन्यांचा लुटला आनंद
शुक्रवारी सायंकाळी उशीरा मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटनपर कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री पुरुष गटात विदर्भ क्रीडा मंडळ काटोल विरूद्ध राजापेठ स्पोर्टींग क्लब अमरावती, तुळजाभवानी क्रीडा मंडळ परतवाडा विरूद्ध नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर आणि महिला गटात नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ विरूद्ध रामनगर स्पोर्टींग क्लब पुलई तथा ह्युमॅनिटी स्पोर्टींग क्लब परतवाडा विरूद्ध जय हिंद क्रीडा मंडळ पचखेडी जि. नागपूर यांच्यात खो-खो चा खेळ रंगला होता. चारही सामन्यांचा खो-खो प्रेमींनी आनंद लुटला.