ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव; दुसऱ्या लाटेल साडेतीनशे व्यक्तींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 05:00 AM2021-04-25T05:00:00+5:302021-04-25T05:00:02+5:30
गेल्यावर्षी कार्यरत असलेली यंत्रणा आताही कार्यरत असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे यंत्रणेवर ताण पडत आहे. विशेषत: या लाटेमध्ये घरातील एकाला कोरोनाची बाधा झाली तर अख्खे घरच बाधित होत आहे. तसेच रुग्णाची ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालये फुल्ल झालेली आहेत. ऑक्सिजनचे बेड मिळविण्यासाठी रुग्णांची धडपड सुरू आहे.
आनंद इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेवर विजय मिळविला होत; पण दरम्यानच्या काळात बिनधास्त नागरिक आणि गाफील प्रशासनामुळे दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केला आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डासह गावागावांत कोरोनाचा शिरकाव झाल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. परिणामी यंत्रणा कमी पडत असल्याने मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. दुसऱ्या लाटेतील गेल्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३५७ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या दीड वर्षातील एकूण ६३३ मृत्यूंपैकी ३५७ मृत्यू या नववर्षातील असून, ते कोरोनाची भीषणता दर्शविणारे आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत १ हजार ३८७ गावे असून, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तब्बल २२७ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखून धरले होते. मात्र, आता त्यातील बहुतांश गावांमध्ये हळूहळू कोरोनाने प्रवेश करायला सुरुवात केली आहे. सध्या जिल्ह्यात रुग्णसंख्या २९ हजार ७४५ झाली असून, यातील २० हजार ७०७ रुग्ण हे या १ जानेवारी ते २३ एप्रिलपर्यंतचे आहेत. यावरून या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग किती झपाट्याने वाढला हे लक्षात येते.
गेल्यावर्षी कार्यरत असलेली यंत्रणा आताही कार्यरत असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे यंत्रणेवर ताण पडत आहे. विशेषत: या लाटेमध्ये घरातील एकाला कोरोनाची बाधा झाली तर अख्खे घरच बाधित होत आहे. तसेच रुग्णाची ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालये फुल्ल झालेली आहेत. ऑक्सिजनचे बेड मिळविण्यासाठी रुग्णांची धडपड सुरू आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांनाच योग्य रेफरल पद्धतीने बेड उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहे. सोबतच ऑक्सिजनचे बेडही वाढविण्यात आल्याने रुग्णांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र, वाढती रुग्णसंख्या आणि रुग्णालयातील अल्प बेड यामुळे तत्काळ नव्याने कोविड रुग्णालय उभारून बेडची व्यवस्था करण्याची गरज आहे.
भविष्यातील गरज लक्षात घेता वर्धा शहराशेजारी १ हजार ५०० खाटांचे जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन असून त्यासाठी पालकमंत्र्यांनी हिरवीझेंडी दिली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी युद्धपातळीवर प्रारुप आराखडा तयार करीत असून कोविड रुग्णालयाचे अतिदक्षता विभाग अधिग्रहित केलेल्या विद्यालयाच्या वाचनालयात करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तेथे ५० टनचा एसी युनिट बसविण्यात येणार आहे. हे जम्बो रुग्णालय लवकर सुरू होईल अशी आशा आहे.
ऑक्सिजनसाठी किमान तीस किलोमीटरचा प्रवास
कोरोनाचा प्रकोप चांगलाच वाढायला लागला असून, दररोज रुग्णसंख्या ही पाचशेच्या वरचा आकडा गाठत आहे. या दुसऱ्या लाटेमधील कोरोनाबाधित रुग्णाची ऑक्सिजन पातळी खालावत असल्याने रुग्णांची ऑक्सिजनसाठी धावाधाव होत आहे. जिल्ह्यात सावंगी व सेवाग्राम या दोन रुग्णालयांकडे जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील रुग्णाची धाव असल्याने ऑक्सिजन बेडसाठी अडचणी येत आहेत. आता रुग्ण खाटा वाढविल्या असून, तालुकास्तरावरही ऑक्सिजन बेड उपलब्ध होत आहे. त्यामुळे रुग्णाला साधारणत: ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी तीस किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे.
ऑक्सिजनकरिता ताटकळ; पण रुग्णाचा मृत्यू नाही
जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या आणि रुग्णाला आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. ऑक्सिजन पुरविण्याकरिता कंपन्यांसह लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेतला असून, ऑक्सिजनच्या खाटांची व्यवस्था वाढविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णाला काही काळ बेडच्या प्रतीक्षेत खुर्चीवर बसून ऑक्सिजन लावले जात आहे; पण ऑक्सिजन न मिळाल्याने जीव गमावण्याची वेळ अद्याप कोणत्याही रुग्णावर आलेली नाही.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, आता गावखेड्यामध्येही रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर सर्वांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने ऑक्सिजन बेड वाढविण्यावरही भर दिला जात आहे. ऑक्सिजन मिळाले नाही म्हणून एकाही रुग्णाचा अद्याप मृत्यू झालेला नाही.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.