एस.आर. जिनिंगचा परवाना निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:55 PM2018-12-10T23:55:00+5:302018-12-10T23:55:35+5:30
येथील एस.आर. जिनिंगमध्ये शेतकऱ्याला आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याकरिता एका हातात पाण्याने भरलेला ग्लास तर दुसऱ्या हातात कापूस घेऊन सत्यपणाची शपथ घ्यायला लावली. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच सर्वत्र खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : येथील एस.आर. जिनिंगमध्ये शेतकऱ्याला आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याकरिता एका हातात पाण्याने भरलेला ग्लास तर दुसऱ्या हातात कापूस घेऊन सत्यपणाची शपथ घ्यायला लावली. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच सर्वत्र खळबळ उडाली. शेतकऱ्याचा अवमान करणाऱ्या या जिनिंगचा परवाना रद्द करण्याची मागणी आधार व युवा संघर्ष संघटनेने बाजार समितीकडे लावून धरताच बाजार समितीने सोमवारी एस.आर. जिनिंगचा परवाना निलंबित केला.
सोडी येथील शेतकरी अनिल मोहोड यांनी एस.आर.जिनिंगमध्ये कापूस विक्रीकरिता आणला होता. वाहनासह तोलाई करुन त्यांना काटापट्टी देण्यात आली. परंतू गाडी खाली करतांना जिनिंगच्या कर्मचाºयाने त्यांना ४ क्विंटल कापूस कमी असल्याचे सांगितले. मोहोड यांनी काटापट्टी दाखविली असता कर्मचाºयाने ती हिसकावून घेतली. त्यामुळे कर्मचारी व शेतकरी यांच्या वाद झाल्याने जिनिंगच्या मालकाला बोलाविण्यात आले. मालकाने आपल्याच कर्मचाऱ्याची बाजु घेत मोहोड यांना प्रामाणिकपणा सिध्द करण्यासाठी शपथ घ्यायला लावून अवमान केला. त्यामुळे संताप व्यक्त करीत आधार व युवा संघर्ष संघटनेच्यावतीने सोमवारी शेतकºयांना सोबत घेऊन बाजार समिती गाठली. यावेळी अन्यायग्रस्त शेतकरी अनिल मोहोडही सोबत होते. या सर्वांनी सभापती विद्याधर वानखेडे, उपसभापती रामकृष्ण उमाटे, सचिव आय.आय.सुफी यांच्याशी चर्चा करुन जिनिंगचा परवाना हंगामभर निलंबीत करण्याची मागणी केली. बाजार समितीने शनिवारीच एस.आर.कॉटन जिनिंग फॅक्ट्रीचे प्रमुख राजेश जोतवाणी यांनी नोटीस देऊन सोमवारी दुपारपर्यंत म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर सोमवारी आंदोलकांच्या मागणीनुसार व जिनिंग मालकाच्या उत्तरानंतर जिनिंगचा परवाना निलंबीत करण्याचा आदेश पारित केला.
यावेळी आधार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जतीन रणनवरे, शुभम झाडे, प्रशांत झाडे व युवा संघर्ष संघटनेचे अध्यक्ष शुभम लुंगे यांच्यासह दोन्ही संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.