नागपूर-यवतमाळ मार्गाने धावणारी लालपरी सेलू अन् देवळी स्थानकात देणार हजेरी
By महेश सायखेडे | Updated: May 23, 2023 15:47 IST2023-05-23T15:46:02+5:302023-05-23T15:47:29+5:30
रापम उपमहाव्यवस्थापकांच्या तब्बल सोळा विभाग नियंत्रकांना सूचना

नागपूर-यवतमाळ मार्गाने धावणारी लालपरी सेलू अन् देवळी स्थानकात देणार हजेरी
वर्धा : नागपूर-यवतमाळ मार्गाने धावणाऱ्या जलद बसेस सेलू आणि देवळी येथील बस स्थानकात न येताच या दोन्ही शहराबाहेरील बायपासने जात असल्याने याचा फटका विद्यार्थ्यांसह नागरिकांना सोसावा लागत होता. ही समस्या निकाली काढण्यात यावी अशी मागणी झाल्यावर २२ मे २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उपमहासंचालकांनी एक पत्र निर्गमित करून तब्बल सोळा विभाग नियंत्रकांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहे. याच पत्रानुसार आता सेलू आणि देवळी या स्थानकात नागपूर-यवतमाळ मार्गाने धावणाऱ्या रापमच्या जलद बसचा थांबा राहणार आहे.
अशा आहेत महत्त्वाच्या सूचना
- नागपूर-यवतमाळ-नागपूर या मार्गावर धावणाऱ्या रापमच्या केवळ लांब पल्ला तसेच शिवशाही व हिरकणी फेऱ्या वगळता इतर सर्व जलद, साधारण फेऱ्यांची वाहतूक जाताना व येताना सेलू व देवळी बस स्थानकावरुन करण्याबाबतच्या सूचना सर्व संबंधित आगार व्यवस्थापक यांचेमार्फत चालक वाहकांना देण्यात याव्यात.
- शिवाय संबंधित सूचना प्राप्त झाल्याबाबत संबंधित चालक-वाहक यांची स्वतंत्र नोंद वहीत स्वाक्षरी घेण्यात यावी. त्याचप्रमाणे सदरच्या फेऱ्यांच्या मार्ग फलकावर सेलू व देवळी थांबा नमूद करण्यात यावा.
- संबंधित फेऱ्या या सेलू व देवळी बस स्थानकाचे आत न गेल्याबाबतची तक्रार उद्भवल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभाग आणि आगार व्यवस्थापकांची राहणार आहे.