आर्वीत एसटी चालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर रॉकेल घेत स्वत:ला केले आगीच्या हवाली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 08:54 PM2021-12-14T20:54:18+5:302021-12-14T20:55:22+5:30

राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार वर्धा जिल्ह्यात असून वर्धा आगारातून अजूनही एकही बस सोडण्यात आलेली नाही.

ST driver attempted suicide in aarvi village of Vardha | आर्वीत एसटी चालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर रॉकेल घेत स्वत:ला केले आगीच्या हवाली

आर्वीत एसटी चालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर रॉकेल घेत स्वत:ला केले आगीच्या हवाली

googlenewsNext

वर्धा: दिवाळीपूर्वीपासून रापमचे कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या माध्यमातून विलीनीकरणाचा लढा देत आहेत. याच आंदोलनात सहभागी असलेल्या रापमच्या आर्वी आगारातील कायमस्वरूपी चालकाने अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला आगीच्या हवाली करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत सदर चालक २८ टक्के भाजला आहे. त्याला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.५० वाजताच्या सुमारास घडली असून अरुण शिवाजी माहोकार (५६) रा. एलआयजी कॉलनी, आर्वी असे जखमी चालकाचे नाव आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार वर्धा जिल्ह्यात असून वर्धा आगारातून अजूनही एकही बस सोडण्यात आलेली नाही. तर आर्वी आगारातील काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्याने बोटावर मोजण्या इतक्या बसेस पोलीस बंदोबस्तात सोडल्या जात आहे. असे असले तरी विलीनीकरणाच्या लढ्याला समर्थन देत आर्वी आगारातील चालक अरुण शिवाजी माहोकार हे आदोलनांत सहभागी होते.

अशातच मनोधैर्य खचलेल्या अरुण यांनी मंगळवारी सायंकाळी राहत्या घरी अंगावर रॉकेल घेत स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमी अरुण यांना तातडीने आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमरास दाखल झालेल्या अरुण यांना प्राथमिक उपचाराअंती सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात बर्न वॉर्ड नसल्याने २८ टक्के भाजलेल्या अरुण शिवाजी माहोकार यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात ८ वाजताच्या सुमारास रेफर करण्यात आले आहे.

- डॉ. उज्ज्वल देवकाते, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, आर्वी.
 

आर्वी आगारातील अरुण माहोकार नामक कायमस्वरूपी चालकाने अंगावर रॉकेल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मला आताच मिळाली. सदर कर्मचारी आंदोलनात सहभागी असला तरी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नव्हती.
- चेतन हसबनीस, विभाग नियंत्रक, रापम, वर्धा.

Web Title: ST driver attempted suicide in aarvi village of Vardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.