वेतन विलंबामुळे एसटी कर्मचारी आक्रमक; प्रवेशद्वारासमोर निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 06:13 PM2024-07-12T18:13:57+5:302024-07-12T18:15:09+5:30
Vardha : नियोजित तारखेवरच वेतन देण्याची मागणी धरली रेटून
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाने देय तारखेस म्हणजेच ७ तारखेलाच वेतन अदा करण्याचे न्यायालयात मान्य करूनही जुलै महिन्याची १० तारीख उलटून गेली असूनही वेतन वेळेवर झाले नसल्याने एसटी कर्मचारी आक्रमक झाले. सेवाग्राम येथील वर्धा विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी ११ रोजी संयुक्त कृती समितीकडून जोरदार निदर्शने करून निषेध नोंदविण्यात आला.
राज्य परिवहन महामंडळाने न्यायालयासमक्ष कर्मचाऱ्यांचे वेतन ७ तारखेलाच अदा करण्याचे मान्य केले होते. मात्र, १० तारीख उलटून गेली असूनही वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी पसरली आहे. प्रशासनाकडून जी फाईल मंत्रालयातील वित्त विभागाकडे पाठवण्यात आली होती ती बजेट प्रोव्हिजन नसल्याने नाकारण्यात आली आहे.
आता नव्याने प्रोव्हिजन झाली असली तरी सर्व सोपस्कार पूर्ण करून मुख्यमंत्र्यांची मंजुरी घेऊन वेतन देण्यास विलंब लागणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी महिनाभर कष्ट केले. मात्र, त्यांना हक्काचे वेतन मिळाले नसल्यामुळे वर्धा विभागीय कार्यशाळेच्या प्रवेशद्वारावर 'पगार आमचा हक्काचा, जोर जुल्म की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने विभागीय कार्यशाळेचे कर्मचारी उपस्थित होते.