प्रवाशांचे हाल एसटी कर्मचाऱ्यांना पाहवेनात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 05:00 AM2021-11-25T05:00:00+5:302021-11-25T05:00:07+5:30
आम्ही आमच्या न्यायिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने लढा देत आहोत. आमच्या काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांना त्रास होत आहे याची आम्हाला जाण आहे. परंतु, आम्ही आता आमचा लढा मागे घेतला तर, आतापर्यंत दिलेल्या लढ्याला अर्थ उरणार नाही, असे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर रापमच्या एका चालकाने सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रापमच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे रापमच्या बसेस आगारांमध्येच उभ्या आहेत. असे असले तरी खासगी प्रवासी वाहतूक सेवा सुरू असली तरी खासगी प्रवासी वाहतूक करणारे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना वाहनांत कोंबून प्रवाशांची ने-आण करीत असल्याने खासगी प्रवासी वाहतूक सध्या धोक्याची ठरत आहे. प्रवाशांचे होणारे हाल एसटी कर्मचाऱ्यांना पाहवत नसून आमच्या मागण्यांचा शासनाने वेळीच विचार करून योग्य निर्णय घ्यावा आणि पुन्हा रापमची प्रवासी बस सेवा सुरू करावी, अशी अपेक्षा आहे.
प्रवाशांना त्रास होतोय, आम्हालाही कळतेय...
आम्ही आमच्या न्यायिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने लढा देत आहोत. आमच्या काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांना त्रास होत आहे याची आम्हाला जाण आहे. परंतु, आम्ही आता आमचा लढा मागे घेतला तर, आतापर्यंत दिलेल्या लढ्याला अर्थ उरणार नाही, असे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर रापमच्या एका चालकाने सांगितले.
जिल्ह्यातील काही भागात खासगी प्रवासी वाहतूक करणारे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना वाहनांमध्ये कोंबून प्रवााशांची ने-आण करीत आहे. या परिस्थितीमुळे प्रवाशांना त्रास होत असल्याची आम्हाला जाण आहे. पण, आमचा लढा न्याय हक्कांसाठीच आहे, असे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर रापमच्या एका वाहकाने सांगितले.
मागण्या योग्य पण, वेठीस धरणे अयोग्य
आंदोलनामुळे रापमच्या बसेस आगारांमध्येच आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. आंदोलनकर्त्यांनी त्यांचा लढा कायम ठेवावा पण, प्रवाशांना त्रास होत आहे याचीही जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे.
- सुनील उईके, प्रवासी.
रापमचे कर्मचारी आपल्या न्यायिक मागण्यांसाठी लढा देत आहेत. असे असले तरी त्यांनी शासन तसेच प्रवाशांना वेठीस धरणे हे अयोग्यच आहे. आंदोलनकर्त्यांनी प्रवाशांचाही विचार करावा.
- गजानन तुपकर, प्रवासी.
६१ कर्मचाऱ्यांवर झाली निलंबनाची कारवाई
- आंदोलन मागे घेत कामावर रुजू होण्यासंदर्भात वारंवार विनंती करूनही अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे पाठ दाखविली जात असल्याचा ठपका ठेवून आतापर्यंत तब्बल ६१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
- असे असले तरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या रापमच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच आहे. मंगळवारी तळेगाव आगारातून आष्टी मार्गावर केवळ एक बस सोडण्यात आली. या बसने दिवसभरात पाच फेऱ्या पूर्ण केल्या.