ST Strike : आंदोलनकर्त्या एसटी वाहकाची किडनी निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 11:01 AM2022-01-13T11:01:00+5:302022-01-13T11:13:27+5:30

मोहम्मद सलीम हे ११ वर्षांपासून वाहक म्हणून आर्वीच्या आगारात कार्यरत आहेत. घरची परिस्थिती जेमतेम असून, सहा जणांच्या कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

st strike : Kidney failure of agitating ST worker | ST Strike : आंदोलनकर्त्या एसटी वाहकाची किडनी निकामी

ST Strike : आंदोलनकर्त्या एसटी वाहकाची किडनी निकामी

googlenewsNext
ठळक मुद्देउपोषण मंडपात असह्य पोटदुखी आर्थिक विवंचनेने कर्मचाऱ्याला ग्रासले

देऊरवाडा/आर्वी (वर्धा) : राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून, अद्यापही तोडगा निघाला नाही. या आंदोलनात नियमितपणे सहभागी असलेल्या एका एसटी वाहकाच्या पोटात अचानक दुखणे सुरू झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु दुखणे असह्य असल्याने अमरावतीच्या रुग्णालयात हलविले असता, एक किडनी निकामी झाल्याचे निदान करण्यात आले. त्यामुळे या कर्मचाऱ्याचे कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले आहे.

मोहम्मद सलीम (३७, रा. हनुमान वॉर्ड) असे या वाहकाचे नाव आहे. आंदोलन मंडपात असताना त्यांच्या अचानक पोटात दुखायला लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु असह्य वेदना असल्याने अमरावतीच्या रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांची एक किडनी निकामी झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

संप काळात आधीच कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही, त्यातच आता हा आजार बळावल्याने कुटुंबापुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. कुटुंबीयांना उसने पैसे गोळा करून सव्वा लाख रुपयांचा खर्च एका आठवड्यात करावा लागला. परिस्थिती पाहून रुग्णालयानेही या कर्मचाऱ्याच्या बिलामध्ये सूट दिली.

अकरा वर्षांपासून कार्यरत

मोहम्मद सलीम हे ११ वर्षांपासून वाहक म्हणून आर्वीच्या आगारात कार्यरत आहेत. घरची परिस्थिती जेमतेम असून, सहा जणांच्या कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आई-वडील, पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. दोन महिन्यांपासून पगार नाही. अशा परिस्थितीत एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना कोणतीही मदत करीत नाही. त्यामुळे आता काय करावे, असा बिकट प्रश्न घरच्यांपुढे उभा ठाकला आहे.

आमचे दुखवटा आंदोलन अद्याप सुरूच असून, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. शासन आमचा जीव घेण्याच्या परिस्थितीत आहे. आमचे परिवार व मागणीचा थोडाही विचार केला जात नाही, हीच मोठी शोकांतिका आहे.

किशोर लोणारे, यांत्रिकी कर्मचारी

अनेक कर्मचारी महामंडळाच्या एकतर्फी निर्णयामुळे आता धास्तावले आहेत. दोन महिन्यांपासून पगार नाही. अनेकांच्या कुटुंबातील व्यक्तींना प्रकृतीच्या तक्रारी आहेत. औषधोपचार कसा करावा? जगावे कसे ? शासनाने आमची गुलामापेक्षाही वाईट परिस्थिती केली आहे.

रवी गहलोत, वाहक

Web Title: st strike : Kidney failure of agitating ST worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.