‘शेतकरी आरक्षण’ अभियानाला प्रारंभ
By admin | Published: April 26, 2017 12:28 AM2017-04-26T00:28:11+5:302017-04-26T00:28:11+5:30
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीज बिल माफी द्यावी, वर्षभर रास्त हमीभाव द्यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
शैलेश अग्रवाल : कर्ज-वीज बिल माफी, रास्त हमीभावाची मागणी
वर्धा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीज बिल माफी द्यावी, वर्षभर रास्त हमीभाव द्यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून मागास जाती-जमातींना जसे आरक्षण लागू केले, तसे शेतकरी कुटुंबाना शैक्षणिक, नोकरी व पदोन्नतीत आरक्षण लागू करावे या मागण्यांकरिता सेवाग्राम आश्रमातून ‘एकच मिशन, शेतकरी आरक्षण’ अभियान सुरू केल्याची माहिती गोतीर्थ प्रकल्पाचे संचालक व प्रगतशील शेतकरी शैलेश अग्रवाल यांनी दिली.
विश्रामगृहात सोमवारी झालेल्या पत्रपरिषदेला माजी पं.स. उपसभापती संदेश किटे, म्हसाळाचे सरपंच संदीप पाटील, उपसरपंच अनिल उमाटे, दीवाकर श्रावणकर आदी उपस्थित होते. अग्रवाल पूढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी आरक्षणासारखा उपाय राज्यघटनेंतर्गत लागू केल्याने सामाजिक विषमता बव्हंशी कमी झाली आहे. याच न्यायाने शेतकऱ्यांना आरक्षण लागू झाल्यास शिक्षण, नोकरी व पदोन्नतीत संधी मिळेल. महागडे उच्चशिक्षण पैशाअभावी घेऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांची मुले, भावंडे मागे राहतात. शेतमालाचे हमीभाव ठरविण्याची पद्धत चुकीची आहे. यामुळे आर्थिक विवंचनेच्या गर्तेत सापडून शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांची गुणवंत मुले पैशाअभावी अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर उच्चशिक्षण घेऊ शकत नाही. आरक्षण मिळाल्यास शिकता येईल, नोकरी व पदोन्नतीद्वारे शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार होईल, असेही अग्रवाल यांनी सांगितले. एकदा सर्व शेतकऱ्यांना बँका, खासगी सावकार आणि वीज बिलापासून मुक्त करावे. नव्याने जीवन जगण्याची संधी द्यावी, अशी मागणी अग्रवाल यांनी केली. शेतकऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत हे अभियान सुरू राहील. मार्ग निश्चित नसून राज्यात जिथे शेतकरी बोलवतील, तिथे आपण जाऊ, असेही त्यांनी नमूद केले.(कार्यालय प्रतिनिधी)