सिंदीत नवीन अंगणवाड्या सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 06:00 AM2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिंदी (रेल्वे) : शहरात केवळ प्रभाग क्र. १ व ७ मध्येच अंगणवाडी आहे. प्रभाग १ व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : शहरात केवळ प्रभाग क्र. १ व ७ मध्येच अंगणवाडी आहे. प्रभाग १ व ७ च्या व्यतिरिक्त इतर प्रभागातील महिला व शिशुंना लाभ मिळत नाही. बालकांचा सर्वांगीण विकास होण्याच्या अनुषंगाने प्रभाग क्र. २, ३, ५, ६ व ८ मध्ये नवीन अंगणवाडी सुरू कराव्या, अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने संघाचे सचिव अमोल सोनटक्के यांनी खासदार रामदास तडस यांना निवेदनाद्वारे केली.
अंगणवाडी योजनेअंतर्गत शहरातील प्रभाग क्र. १ व ७ मधील पात्र गर्भवती महिला ते ३ वर्षांपर्यंतच्या शिशुला अंगणवाडीच्या माध्यमातून डाळ, तांदूळ व इतर कच्च्या धान्याचा नि:शुल्क पुरवठा होत आहे. मात्र, शहरातील प्रभाग क्र. २, ३, ५, ६ व ८ या प्रभागातील पात्र महिला व शिशुंना या प्रभागात अंगणवाडी नसल्याकारणाने होत असलेल्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यापासून वंचित राहावे लागते.
त्यामुळे याची दखल घेत या प्रभागातदेखील नवीन अंगणवाडी सुरू करण्याबाबतचे निवेदन पत्रकार संघाच्या वतीने खासदार रामदास तडस यांना दिले. यावेळी त्यांनी तत्काळ बालविकास प्रकल्प अधिकारी यांना नवीन अंगणवाडी सुरू करण्याबाबत विचारणा केली असता नगरपालिकेअंतर्गत प्रस्ताव बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सादर करावे. त्यानंतर प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे मंजुरीकरिता पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले.
खासदार तडस यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर केंद्राकडून नवीन अंगणवाड्यांना ताबडतोब मंजुरी मिळवून देण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे नगर परिषदने त्वरीत नविन अंगणवाडी प्रस्ताव सादर करून शहरातील सर्वच प्रभागातील पात्र महिला व शिशुंना लाभ मिळेल याकरिता प्रयत्न करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नगरपरिषद संबंधित विभागाकडे त्वरित प्रस्ताव सादर करतील अशी अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येत आहे.