जंतनाशक मोहिमेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:17 AM2018-02-13T00:17:24+5:302018-02-13T00:17:45+5:30
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ भारत विद्यालय, हिंगणघाट येथून करण्यात आला. या उपक्रमात १ ते १९ वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात येत आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ भारत विद्यालय, हिंगणघाट येथून करण्यात आला. या उपक्रमात १ ते १९ वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात येत आहे.
जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. राज गहलोत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, डॉ. मंगेश रेवतकर, डॉ. प्रभाकर नाईक, डॉ. प्रवीणा मिसाळ, श्रद्धा घोडवैद्य यांच्या उपस्थितीत मोहिमेला शुभारंभ करण्यात आला. भारत विद्यालय येथे विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के (२४१ दशलक्ष) मुले असून त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणारे परजीवी जंतापासून धोका आहे. याचे प्रमुख कारण वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव आहे. या कृमीदोषाचा संसर्ग दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो. बालकामध्ये होणार दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे. शिवाय बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे ते कारण ठरते. भारतात ६ ते ५९ महिन्यांच्या वयोगटातील प्रत्येकी १० बालकांमागे ७ बालकांमध्ये रक्तक्षय आढळतो. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. तसेच १५ ते १९ वर्ष वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये ३० टक्के तर किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्याचेही कारण आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन वर्षातुन दोनदा राबविण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राज गहलोत यांनी केले. संचालन विजय जांगडे यांनी केले तर आभार डॉ. प्रभाकर नाईक यांनी मानले. कार्यक्रमाला गीता मेश्राम, पी.एच.एन. जाधव, पं.स. हिंगणघाट व आरोग्य विभागातील कर्मचारी व शाळेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
मोहिमेचा उद्देश
१ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलां-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश असल्याचे यावेळी सांगितले.
वर्धा जिल्ह्यातील ९१६ शासकीय शाळा, ९१ शासकीय अनुदानित, ९ नगरपालिकेच्या शाळा, १४६ खासगी अनुदानित अशा एकूण १ हजार १७३ शाळा व १ हजार ४५४ अंगणवाडीतील बालकांना तसेच शहरी भागातील १३५ शाळा व १५० अंगणवाडीतील १ ते १९ वर्ष वयोगटातील बालकांना व १ ते १९ वर्ष वयोगटातील शाळाबाहेरील बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे.