वर्धा आगारात रस्ता सुरक्षा मोहिमेचा प्रारंभ
By admin | Published: January 13, 2017 01:21 AM2017-01-13T01:21:25+5:302017-01-13T01:21:25+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा आगारात रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे.
रापमचा उपक्रम : प्रवाशांच्या सुरक्षिततेवर देणार भर
वर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा आगारात रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी विनोद जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक आर. किल्लेकर, माजी आगार व्यवस्थापक ताकसांडे, यंत्र अभियंता राजगुरे, व्यवस्थापक राठोड, विभागीय अधिकारी सुतवणे, विभागीय अधिकारी सहस्त्रभोजनी यांची उपस्थिती होती.
प्रवाशांच्या सुरक्षिकतेकरिता या अभियानात विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. मार्गदर्शन करताना जिचकार म्हणाले, रस्ते वाहतुकीत सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. परिवहन महामंडळ हे प्रवाशांची सुरक्षित सेवा करणारे महामंडळ आहे. प्रवाशांचा असणारा विश्वास असाच कायम ठेवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. रस्ता सुरक्षितता मोहिमेत चालक वाहक सांघिक भावनेने एकत्र येणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतीज्ञेचे वाचन केले. तसेच विनाअपघात सेवा करणाऱ्या चालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर बोलताना ताकसांडे यांनी प्रवाशांना एस.टी. विषयीचा विश्वास अजूनही कायम आहे. यासाठी प्रवशांना चांगली सेवा कशी देता येईल यासाठी प्रयत्नशील राहण्याकरिता सूचित केले. प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास वृद्धींगत करावा. वाहतुकीच्या कार्यपद्धती पाळण्यावर भर द्यावा. व रा.प. वाहनांचा अपघात होणार नाही याची योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन ताकसांडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुतवणे यांनी केले. संचालन आशिष बाळसराफ यांनी तर आभार बोबडे यांनी मानले. कार्यक्रमाला तरोडे, वाणी गुंडतवार, खांडस्कर, युनियनचे पदाधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले. याकेळी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)