१७३ जागांसाठी आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ
By admin | Published: July 3, 2017 01:47 AM2017-07-03T01:47:08+5:302017-07-03T01:47:08+5:30
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत जिल्ह्यातील विना अनुदानित, कायम विना अनुदानित,
सोमवारपर्यंत मुदत : इयत्ता पहिली व नर्सरीतील प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत जिल्ह्यातील विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वयं अर्थसहायय्यित शाळांत २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले आहे. यातील ३९ शाळांत पहिलीच्या १७३ तर १३ शाळांमध्ये नर्सरीच्या १३ जागा शिल्लक आहे. यासाठी प्रवेशाचा दुसरा टप्पा राबविला जात असून सोमवारपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेशाकरिता आतापर्यंत १४ फेऱ्या घेण्यात आल्या. यातून ४३ शाळांच्या १८६ जागा शिल्लक राहिल्या आहेत. यातील ३९ शाळांच्या १७३ जागा पहिलीकरिता तर चार शाळांच्या १३ जागा नर्सरीकरिता शिल्लक आहे. पहिल्या फेरीतील अर्ज शिल्लक नसल्याने पुन्हा अर्ज मागविले आहे. यासाठी सोमवारपर्यंत मुदत दिली आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या पालकांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. पहिल्या फेरीत लॉटरी न लागलेल्या पालकांना जुनाच फॉर्म ओपन करून स्कूल सिलेक्शनवर क्लिक करीत शाळा निवडता येईल. पहिल्या फेरीत अर्ज भरून शाळा मिळाली; पण प्रवेश घेतला नाही, अशांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
अर्ज करताना कागदपत्रे अपलोड करायची नसून निश्चितीनंतर प्रवेश घेताना कागदपत्रांची पुर्तता करावी लागेल. यात बालकांचा जन्माचा दाखला, रहिवासी दाखला, वंचित घटकांसाठी पालकांचे जात प्रमाणपत्र, आर्थिक व दुर्बल घटकांना उत्पन्न दाखला, दिव्यांगांना ४० टक्केपेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. अंतराची बाब लक्षात घेत शाळेची निवड करायची आहे. पालकांनी आॅनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) हजारे यांनी केले आहे.