गृहरक्षकांच्या राज्यव्यापी आंदोलनाला प्रारंभ
By admin | Published: July 17, 2016 12:26 AM2016-07-17T00:26:18+5:302016-07-17T00:26:18+5:30
होमगार्ड म्हणून गत १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या गृहरक्षकांना सेवेतून कमी करण्याचे आदेश राज्य शासनाने निर्गमित केले आहे.
शहरातून मोर्चा : वर्धेसह इतर जिल्ह्यातील गृहरक्षकांचा सहभाग
वर्धा : होमगार्ड म्हणून गत १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या गृहरक्षकांना सेवेतून कमी करण्याचे आदेश राज्य शासनाने निर्गमित केले आहे. हा आदेश रद्द करण्याची मागणी होमगार्डच्यावतीने करण्यात आली होती. मात्र यावर शासनाच्यावतीने कुठलीही निर्णय घेण्यात आला नसल्याने गृहरक्षकांनी दिलेल्या निवेदनानुसार शनिवारपासून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून राज्यव्यापी आंदोलनाला प्रारंभ केला आहे. बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्या पुढाकारत होत असलेल्या या आंदोलनात वर्धेसह इतर जिल्ह्यातील गृहरक्षकही सहभागी झाले आहेत.
तत्पूर्वी शहरात शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मोर्चा काढत निदर्शने करण्यात आली. शनिवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनात वर्धेतील ५२२ आंदोलकांनी सहभाग घेतला आहे. याशिवाय चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अमरावती व अकोला येथील गृहरक्षक सहभागी झाल्याचे बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने सांगण्यात आले आहे. या संदर्भात आयोजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मागण्यांची माहिती दिली.
राज्यात १९४७ पासून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून गृहरक्षक कार्यरत आहेत. राज्यभर पोलीस विभागातील पदे रिक्त असताना तुटपुंज्या मानधनावर गृहरक्षकांकडून काम करून घेण्यात येत आहे. यातही गृहरक्षकाकडून कुठलाही आक्षेप घेण्यात आला नाही. असे असताना राज्य शसनाच्यावतीने एक आद्यादेश काढत १२ वर्ष सेवा झालेल्या गृहरक्षकांना सेवेतून कमी करण्याचे फरमान सोडले.
शासनाने घेतलेला हा निर्णय मुंबई होमगार्ड अधिनियम १९४७ व १९५३ मधील तरतुदीनुसार नसल्याचा आरोप बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने करण्यात आला आहे. हा निर्णय जर कायद्याच्या अनुरूप असता तर तो मान्य केला असता, असेही फेडरेशनच्यावतीने सांगण्यात आले.
या संदर्भात फेडरेशनच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले असून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मात्र त्यांच्याकडून या संदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने वर्धेतून आंदोलनला प्रारंभ करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)