डिझाईन मंजुरीविना कामांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:31 AM2017-08-28T00:31:41+5:302017-08-28T00:32:14+5:30
काँगे्रस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘गांधी फॉर टुमारो’ भाजप सरकार ‘सेवाग्राम विकास आराखडा’ नावाने राबवित आहे.
प्रशांत हेलोंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : काँगे्रस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘गांधी फॉर टुमारो’ भाजप सरकार ‘सेवाग्राम विकास आराखडा’ नावाने राबवित आहे. यातील कामांना मंजुरी दिली असून जे.पी. कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबईला कंत्राटही दिले; पण अद्याप कुठलेही डिझाईन मंजूर झाले नाही. असे असले तरी कंत्राटदार कंपनीला कामे उरकण्याची लगीनघाई झाली आहे. डिझाईन मंजूर होण्यापूर्वीच कामांना प्रारंभ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून गांधी फॉर टुमारो महात्मा गांधी प्रशिक्षण व अनुसंधान केंद्राच्या पहिल्या टप्प्यासाठी १४४.९९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यात सेवाग्राम, पवनार, वर्धा ते सेवाग्राम रोड तथा अन्य ठिकाणच्या कामांचा समावेश आहे. यातील कामांना मंजुरी मिळाली असून ही कामे जे.पी. कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली. यातील डिझाईन फायनल करण्यासह अन्य तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यासाठी २९ आॅगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. असे असले तरी कंत्राटदार कंपनीला कामांची घाई झाल्याचे दिसून येत आहे. सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत अद्याप कुठल्याही कामांचे डिझाईन फायनल झालेले नाही. असे असताना कंत्राटदार कंपनीने वर्धा ते सेवाग्राम मार्गावर पेट्रोल पंपाच्या बाजूला काम सुरू केले आहे. या सभागृहाचे बांधकाम करणे, पार्किंगची सुविधा निर्माण करणे, कुंपण भिंत बांधणे, भूमिगत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणे यासह अन्य कामांचा समावेश आहे. या कामांसाठी १२ कोटी रुपयांचा निधी निर्धारित करण्यात आला आहे; पण यातील कामांचे डिझाईन मंजूर झालेले नाही. यातील कोणत्या कामात कोणत्या ग्रेडचे साहित्य वापरणार याबाबतचे ‘मीग डिझाईन’ मंजूर झाले नाही. असे असताना कंत्राटदार कंपनीने काम सुरू केले आहे. यातून शासनाच्या निधीची धुळधान केली जात असल्याचेच दिसून येत आहे.
महत्त्वाकांक्षी असलेल्या गांधी फॉर टुमारो या प्रकल्पांतर्गतच मंजुरी न घेता कामे सुरू केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ही कामे कंत्राटदाराकडून करून घेतली जात आहे. यामुळे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
मिग डिझाईनला मंजुरीच नाही
सेवाग्राम मार्गावर पेट्रोल पंपाच्या बाजूला भूमिगत पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले जात आहे. या टाकीचे डिझाईन अद्याप फायनल झाले नाही. यातील भूमिगत पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चर बदलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे बांधकामावर होणारा खर्च अनाठायी ठरणार नाही काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय हे काम करीत असताना कोणत्या गे्रडचे साहित्य वापरणार, याची माहितीही संबंधित विभागाला देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. मग, बांधकामाची परवानगी दिली कुणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सेवाग्राम मार्गावर पेट्रोल पंपाच्या बाजूला सभागृह, कुंपण भिंत, भूमिगत पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले जात आहे. यातील काही डिझाईनला मंजुरी मिळाली आहे. तेच काम सुरू आहे.
- अनंता पटेल, अभियंता, जे.पी. कन्स्ट्रक्शन कंपनी, मुंबई.