अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 10:02 PM2018-02-25T22:02:57+5:302018-02-25T22:02:57+5:30

महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत नव्याने बांधण्यात आलेल्या शस्त्रक्रिया कक्ष तसेच स्कील लॅबचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.

State-of-the-art surgery room | अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष रूजू

अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष रूजू

googlenewsNext
ठळक मुद्देउपराष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ : संस्थेबद्दल जाणून घेतली माहिती

ऑनलाईन लोकमत
वर्धा/सेवाग्राम : महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत नव्याने बांधण्यात आलेल्या शस्त्रक्रिया कक्ष तसेच स्कील लॅबचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, खा.डॉ. विकास महात्मे, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष धिरू मेहता, अधिष्ठाता डॉ. किसन पातोंड, आयुर्विज्ञान संस्थेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.पी. कलंत्री आदी उपस्थित होते.
उपराष्ट्रपती नायडू यांनी डॉक्टर्स येथे निवासी राहतात काय, या वैद्यकीय संस्थेत जेनेरिक औषधींचे वाटप तसेच आयुर्वेदिक उपचार केले जातात काय आदी बाबींची विचारणा केली. यावेळी डॉ. कलंत्री यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे उपराष्ट्रपतींना वैद्यकीय संस्थेबद्दल माहिती दिली. यात स्वस्त दरात देण्यात येणाऱ्या औषधी, माता व बाल आरोग्य केंद्र, शस्त्रक्रिया कक्ष आणि देण्यात येणाऱ्या सुविधा, रुग्णालयाची माहिती, सुविधा, ग्रामीण भागात देण्यात येणाºया वैद्यकीय सेवा, आरोग्य विमा, कर्करोगावरील उपचार आदी बाबींचा समावेश होता.
याप्रसंगी कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सचिव डॉ. बी.एस. गर्ग, डॉ. पूनम शिवकुमार, डॉ. सुचिता तिडके, डॉ. चंद्रशेखर बडोले, डॉ. अजय शुक्ला, डॉ. दिलीप गुप्ता, डॉ. प्रकाश नागपूरे, डॉ. आश्विनी कलंत्री, डॉ. धीरज भंडारी, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे विश्वस्त तापडीया आदी उपस्थित होते.
बापूकुटीसारख्या पद्धतीची घरे शीतकारक
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी खादी प्रोत्साहनासाठी मनरेगामार्फत कामे, हा उपक्रम चांगला आहे. याबाबत मी पंतप्रधानांशी चर्चा करतो, असे सांगितले. उपराष्ट्रपतींनी देशाच्या अनेक भागात घरे आहे; पण बापूकुटीसारख्या पद्धतीची घरे खुप शीतकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी प्रार्थना भूमिची माहितीही जाणून घेतली. आश्रमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसूम पांडे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बापूकुटीच्या भेटीत अभिप्राय नोंदविला. यात गांधींचे तत्वज्ञान व त्यांचे विचार, कार्यकर्ते यांच्याबद्दल त्यांचे विचार पुन्हा उजाळा देणारे असले तरी आजच्या दिवसात खादीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत नोंदविले. यावेळी आश्रमच्या शोभा कवाडकर, संगीता चव्हाण, प्रभा शहाणे, हिराभाई शर्मा, सिद्धेश्वर उमरकर, मिथून हरडे, प्रशांत ताकसांडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोतम मडावी उपस्थित होते.
‘चरखा चलाने मे श्रम है’...
चरखा चालविल्याने संपूर्ण शरीराला श्रम होते. शरीरासाठी ही चांगली क्रिया आहे. सोबतच वस्त्रस्वावलंबन होते, असे भावपूर्ण उद्गार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी बापूकुटीला भेट दिल्यानंतर काढले. सेवाग्राम आश्रमात आगमन झाल्यानंतर नायडू यांनी बापूकुटी, बा-कुटी, आदिनिवास, आखरी निवासाला भेटी दिल्या. यानंतर त्यांनी बापूकुटीमध्ये जाऊन प्रार्थना केली. प्रार्थनेनंतर सेवाग्राम आश्रमाच्या वतीने सूतमाळ, शाल आणि गीताई ग्रंथ देऊन उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी चरख्यावर सुतकताई केली. सुतकताई केल्यानंतर त्यांनी ‘चरखा चलाने मे श्रम भी है. सॉलीड अ‍ॅक्टीव्हीटी है और वस्त्रस्वावलंबन भी है’, असे उत्स्फूर्त उद्गार काढले.
प्रथमच आश्रमात कडेकोट बंदोबस्त
आज प्रथमच आश्रम परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. सर्वत्र पोलीस, सुरक्षा यंत्रणा दिसत होती. आश्रम कार्यकर्त्यांनाही स्थान नव्हते. दोन प्रवेशद्वार बंद ठेवले होते. नेहमीच कार्यक्रम होणारा बकुळी झाडांचा परिसर दोर बांधून सील करण्यात आला होता. सर्वत्र शांतता व सुरक्षा यंत्रणेशिवाय कुणीच दिसत नव्हते. बापू कुटीची कवाडी (लहान गेट) बंद केले होते. यापूर्वी आश्रम व नई तालीम समितीचे कार्यकर्ता एकत्र बसत होते; पण यावेळी चित्र वेगळेच दिसून आले.
पिंपळाखाली चिंतन
राष्टÑपिता महात्मा गांधी यांनी आश्रम परिसरात १९३६ मध्ये पिंपळ वृक्षाचे रोपण केले होते. याबाबत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू माहिती जाणून घेतली. शिवाय शांतता लाभावी म्हणून पिंपळ वृक्षाखाली बराच वेळ चिंतन केले. उपराष्ट्रपती चिंतन करीत असल्याने आश्रम परिसरही स्तब्ध झाला होता.
सुरक्षेमुळे चौक शांत
उपराष्ट्रपती येणार असल्याने सेवाग्राम आश्रम तथा मेडिकल चौकात कडेकोट बंदोबस्त होता. पानठेले, दुकाने सर्व बंद ठेवण्यात आल्याने सर्वत्र शांतता दिसून येत होती.

Web Title: State-of-the-art surgery room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.