राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशालाही कोलदांडा
By admin | Published: June 7, 2015 02:21 AM2015-06-07T02:21:31+5:302015-06-07T02:21:31+5:30
शाळा वर्गखोली बांधकामाची जबाबदारी शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांवर सोपविली होती.
शाळा बांधकाम प्रकरण : अभियंत्याकडून वसुलीलाही बगल
वर्धा : शाळा वर्गखोली बांधकामाची जबाबदारी शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांवर सोपविली होती. यात शिक्षण विभागाकडून निधी मंजूर करून दिला जात होता. सिंदी (मेघे) येथे वर्गखोली बांधकामात अधिक खर्च केल्याच्या नावावर निवृत्त मुख्याध्यापिकेकडून ४५ हजारांची वसुली करण्यात आली. आरटीआय अंतर्गत माहिती मागितली असता दिशाभूल केली तर राज्य आयुक्तांकडे दाद मागितल्यावरही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी कुंभारे यांनी केली आहे.
सिंदी मेघे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कविता कुंभारे यांच्याकडून वर्गखोली बांधकामात अतिरिक्त खर्च केल्याच्या नावावर ४५ हजार रुपये वसूल करण्यात आले. या प्रकरणी आरटीआय अंतर्गत अरुण कुंभारे यांनी शांतीनगर शाळा बांधकामाबाबत मुख्याध्यापिकेची जबाबदारी फिक्स कशी केली, जि.प. कनिष्ठ अभियंता चौधरी यांनी राजीनामा कधी व का दिला, अभियंता चौधरी यांच्याकडून १८ हजार ५९२ रुपये वसूल करण्यात आले काय, त्याची सत्यप्रत, ते कार्यरत असेपर्यंत जबाबदारी का फीक्स करण्यात आली नाही, २०१२ मधील प्रकरणावर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २०१४ मध्ये सुनावणी का घेतली, सुनावणीचा निकाल का दिला नाही, गटशिक्षण अधिकारी व कनिष्ठ अभियंते जबाबदार असताना मुख्याध्यापिकेची सुनावणी न घेता जबाबदारी कशी कायम केली, कनिष्ठ अभियंता निखाडे व सिंग यांनी ले-आऊट दिल्याची प्रत देण्यात यावी व बाजारभाव वाढल्याने ३० हजार रुपयांचे वाढीव अनुदान देण्याची शिफारस करणाऱ्या पत्रावर काय कारवाई केली. ही माहिती मागितली होती. यात खोटी व दिशाभूल करणारी माहिती देत बोळवण करण्यात आली.
यामुळे अरुण कुंभारे यांनी माहिती आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासन व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी निवेदनातून केली.(कार्यालय प्रतिनिधी)