जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला राज्यस्तरीय ‘नॅक्स’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:59 AM2017-09-30T00:59:12+5:302017-09-30T00:59:29+5:30
नागरिकांना अद्यावत आणि सुरळीत आरोग्य सेवा पुरविण्याकरिता वर्धा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला राज्यस्तरीय नॅक्स पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जिल्ह्याचे आरोग्य आरोग्य अधिकारी आणि विभागाच्या आरोग्य उपसंचालकांनी स्वीकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागरिकांना अद्यावत आणि सुरळीत आरोग्य सेवा पुरविण्याकरिता वर्धा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला राज्यस्तरीय नॅक्स पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जिल्ह्याचे आरोग्य आरोग्य अधिकारी आणि विभागाच्या आरोग्य उपसंचालकांनी स्वीकारला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जात्मक सेवा पुरविण्याकरिता हा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरविल्या जात आहे. ही आरोग्य सेवा पुरविण्याकरिता जिल्ह्यातील साहूर प्राथमिक आरोग्य केंद्र अग्रेसर असल्याने पुरस्काराकरिता केंद्राची निवड झाली आहे. येथे देण्यात येत असलेली सुविधा, प्रयोगशाळा नागरिकांकरिता महत्त्वाची ठरत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी पुणे येथे आयोजित एका बैठकीत स्वीकारला.
साहुर प्राथमिक केंद्राप्रमाणे जिल्ह्यातील इतर आठ प्राथमिक आरोग्य केंद्र बनविण्यात येणार आहे. याकरिता खरांगणा, मांडगाव, अल्लीपूर, विजयगोपाल, कन्नमवारग्राम, सिंदी (रेल्वे) आणि हमदापूर येथील आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे. हे केंद्रही अद्यावत करण्यात येणार आहे. सध्या साहुर येथील आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्याला सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य विभागाच्या विविध अभियाचे संचालक तथा आयुक्त डॉ. संजीव कुमार, आरोग्य संचालक सतीश पवार, उपसंचालक संजय जयस्वाल यांची उपस्थिती होती.
सीआरएमकडून होणार पाहणी
आरोग्य यंत्रणा विविध पुरस्कार प्राप्त करीत आहेत. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची पाहणी करण्याकरिता देशपातळीवरील सीआरएम चमू दाखल होणार आहे. ही चमू नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. ही चमू येण्यापूर्वी आरोग्य सेवा पुरविण्यात अग्रेसर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
जिल्हावासियांना यथायोग्य आरोग्य सेवा पुरविण्याकरिता आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहे. मिळालेला पुरस्कार हे याचेच गमक आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि विशेष करून मुख्य कार्यपालन अधिकाºयांचे याकरिता विशेष सहकार्य मिळत आहे.
- डॉ. अजय डावले, जिल्हा आरोग्य अधिकारी.