राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्याची कार्यशाळेत आत्महत्या
By admin | Published: July 15, 2017 02:15 AM2017-07-15T02:15:01+5:302017-07-15T02:15:01+5:30
येथील राज्य परिवहन महामंडळाच्या सेवाग्राम स्थित कार्यशाळेत कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या
रात्रभर कार्यशाळेत मुक्काम : सकाळी आढळला मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या सेवाग्राम स्थित कार्यशाळेत कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत रोजच्या अपमानजनक वागणुकीमुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. प्रभाकर पडोळे असे मृतकाचे नाव आहे.
प्रभाकरने लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने कोणत्या बँकेत किती रक्कम गोळा करून ठेवली याची माहिती लिहून ठेवली आहे. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. चिठ्ठीत रोजच्या अपमानजनक वागणुकीमुळे आत्महत्या केल्याचे समोर आल्याने या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी तपास सुरू केला आहे. होणारा अपमान कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून होता की इतर कुणाकडून याचा खुलासा तपासाअंती होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाच्या सेवाग्राम येथील कार्यशाळेत प्रभाकर पडोळे कुशन विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी ते आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या चोरून कार्यशाळेतच थांबले. याची कुणाला कल्पनाही आली नाही. आज सकाळी सर्व कर्मचारी नित्याप्रमाणे कामावर गेले असता येथे पडोळेचा मृतदेह अटकून असल्याचे दिसून आले. याची माहिती विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविला आहे.
यापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न
च्पडोळे गत काही दिवसांपासून मानसिक आजाराने त्रस्त होते. त्याचे औषधही घेत होते. पडोळे यांनी यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
घटनेनंतर कार्यशाळेत चर्चा करताना कर्मचारी.