वृक्षतोड थांबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन, आमचा विरोध विनाशाला, विकासाला नव्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 05:59 PM2020-08-14T17:59:45+5:302020-08-14T17:59:56+5:30
मानवी जीवनाला अपायकारक ठरणारे निर्णय टाळावेत, विकासकामे ही स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच करावीत, आदी महत्त्वाच्या मागण्या या निवेदनात आहेत.
वर्धा - सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून त्यासाठी ७० मोठ्या वृक्षांची कटाई करण्यात आली आहे. याशिवाय आणखी सुमारे १०० वृक्ष तोडले जाणार आहेत. हे वृक्ष वाचविण्यासाठी सदर रस्ता चौपदरी न करता दोन्ही बाजूने थोडा लहान करावा, अशी मागणी करणारे निवेदन वर्ध्यातील विविध सामाजिक संघटनांचा व परिसरातील नागरिकांचा सहभाग असणाऱ्या वृक्ष बचाओ नागरी समितीद्वारे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना देण्यात आले.
सध्या वृक्ष बचाओ नागरी समितीद्वारे रस्ता रुंदीकरण होणाऱ्या परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या प्रतिक्रिया घेणे सुरू आहे. गांधी पुतळा ते सेवाग्राम आश्रम या सुमारे चार किलोमीटर मार्गावर अनेक शाळा आणि महाविद्यालये आहेत. हा रस्ता चौपदरी झाल्यास स्वाभाविकच वाहनांचा वेग वाढेल आणि अपघातांचे प्रमाणही वाढेल. आमच्या मुलाबाळांचा जीव धोक्यात आणणारा चौपदरी रस्ता आम्हाला नको. उलट दोन किंवा तीन पदरी रस्ता करून दुतर्फा असलेले वृक्ष वाचवावेत, अशी मागणी करणाऱ्या या निवेदनावर या परिसरातील हजारांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे.
विकासकामांना आमचा विरोध नाही. मात्र हा विकास पर्यावरणाला हानी पोहचविणारा नसावा तर गांधी जिल्ह्याच्या शांतिप्रियतेचा आणि साधेपणाचा गौरव वाढविणारा असावा, अशी भूमिका या समितीने घेतली आहे. ज्या भागातील झाडे आधीच तोडल्या गेली आहेत तेथे नियमानुसार त्वरीत वृक्षारोपण करावे, मानवी जीवनाला अपायकारक ठरणारे निर्णय टाळावेत, विकासकामे ही स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच करावीत, आदी महत्त्वाच्या मागण्या या निवेदनात आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना सदर निवेदन देताना सुषमा शर्मा, मुरलीधर बेलखोडे, संजय इंगळे तिगावकर, डाॅ. आलोक बंग यांनी वृक्ष बचाओ नागरी समितीची बाजू मांडली. यात सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी भीमनवार यांनी दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, डाॅ. सचिन पावडे, युवराज गटकळ, डाॅ. अभ्युदय मेघे, डाॅ. आरती गगने व समिती सदस्य उपस्थित होते.
_____________
स्वातंत्र्यदिनी तरुणाईचे वृक्ष वाचवा आंदोलन
एकीकडे वृक्ष वाचवून वर्धा सेवाग्राम हा मार्ग 'शांतिपथ' व्हावा, अशी भूमिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणतज्ज्ञ, गांधीविचारक मांडत आहेत. तर दुस-या बाजूने या वृक्षतोडीचा तसेच अनावश्यक रस्ता रुंदीकरणाचा विरोध म्हणून तरुणाईही आता रस्त्यावर उतरली आहे. शनिवारी स्वातंत्र्यदिनी सकाळी ८.३० ते ११ या दरम्यान तोडलेल्या तसेच कटाईकरिता चिन्हांकित केलेल्या वृक्षांजवळ फलक घेऊन उभे रहात युवकयुवती वृक्षकटाईला आपला विरोध दर्शविणार आहेत. यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच विविध सामाजिक, निसर्गप्रेमी व युवा संघटनांही सहभागी होणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ओजस सु.वि., डाॅ. विठ्ठल साळवे, अद्वैत देशपांडे, शूचि सिन्हा, डाॅ. अनुपमा गुप्ता, अक्षद सोमनाथे, मनोज ठाकरे, डाॅ. मृत्युंजय, शिशीर देशमुख, अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, राहुल तेलरांधे, मोहित सहारे, दर्शन दुधाने, गुरुराज राऊत आदींनी केले आहे.
_____________
मानवी वस्तीतून जाणारे चौपदरी रस्तेच अपघातांना कारणीभूत ठरतात, याबाबत अनेक तज्ज्ञांनी मांडणी केली आहे. गरज नसतानाही विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावावर रस्ते रुंदीकरणाचा आग्रह का धरला जातो, हा प्रश्न अनुत्तरित आहे. गांधी फाॅर टुमारो ही संकल्पना रस्ते अतिभव्य केल्याने नव्हे तर संपूर्ण परिसर निसर्गसंपन्न केल्यानेच पूर्णत्वाला जाईल.