‘त्या’ वक्तव्याचे पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 09:56 PM2018-03-17T21:56:08+5:302018-03-17T21:56:08+5:30
नव्या शैक्षणिक सत्रात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी व्ही.पी. कानवडे यांनी शिक्षकांविषयी आक्षेपार्ह विधान केले.
ऑनलाईन लोकमत
समुद्रपूर : नव्या शैक्षणिक सत्रात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी व्ही.पी. कानवडे यांनी शिक्षकांविषयी आक्षेपार्ह विधान केले. या विधानाचे पडसाद आता जिल्हाभर उमटत आहेत.
या निषेधात शनिवारी समुद्रपूर येथील शिक्षकांनी मोर्चा काढून शिक्षणाधिकाऱ्याच्या निषेधाचे निवेदन पंचायत समितीत सादर केले.
यंदाचे शैक्षणिक वर्ष संपत असून शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार शिक्षकांनी उत्तम कामगिरी बजावली. या कामगिरीअंतर्गतच २०१८-१९ या नव्या शैक्षणिक सत्राकरिता काही उपक्रम राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्या उपक्रमाची माहिती देण्याकरिता शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींसह केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी व्ही.पी. कानवडे यांनी शिक्षकांना आज कोणीच विचारत नाही. यासह अनेक आक्षेपार्ह विधान केले. या विधानाचे पडसाद जिल्हाभर उमटत असून समुद्रपूर येथील प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे गावंडे यांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीवर शिक्षकांचा मोर्चा नेण्यात आला. यावेळी गटविस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना निषेध नोंदविण्यासंदर्भात निवेदन सादर केले. तसेच शनिवारी तालुक्यातील सर्वच शिक्षकांनी या निषेधात काळ्या फिती लावून काम केल्याचे दिसून आले.
शिक्षकांनी मोर्चे टाळावे
शिक्षणाधिकारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे शिक्षकांत चांगलीच नाराजी व्यक्त झाली असून संतापाची लाट आहे. या संतापामुळे शिक्षक या नव्या शिक्षणाधिकाºयांविरोधात मोर्चे काढण्याच्या तयारीत आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून शिक्षकांवर मोर्चे टाळण्याचा दबाव आणण्याचे प्रयत्न होत आहे. मोर्चे टाळण्याकरिता शिक्षणाधिकाºयांनी शिक्षकांची माफी मागावी अशी भूमिका शिक्षक संघटनांनी घेतली असून सदर प्रकरण चिघळण्याच्या मार्गावर आहे.