शहरातील पुतळ्यांना अतिक्रमणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 05:00 AM2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:31+5:30
शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयापुढील देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे. या पुतळ्याला दररोज मालवाहू वाहनांनी वेढा घातलेला असतो. याशिवाय पुतळ्यावर धुळीचा थर असून स्वच्छता केली जात नाही. केवळ जयंती आणि पुण्यतिथीलाच नगरपालिकेला स्वच्छतेचा पुळका येतो. इतरवेळी पुतळ्यांची देखभाल आणि सुरक्षा वाऱ्यावर असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील इतिहासाची साक्ष देणाºया अनेक पुतळ्यांना अतिक्रमणाने सदैव विळखा घातलेला असतो. याशिवाय देखभालही वाऱ्यावर असून याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयापुढील देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे. या पुतळ्याला दररोज मालवाहू वाहनांनी वेढा घातलेला असतो. याशिवाय पुतळ्यावर धुळीचा थर असून स्वच्छता केली जात नाही. केवळ जयंती आणि पुण्यतिथीलाच नगरपालिकेला स्वच्छतेचा पुळका येतो. इतरवेळी पुतळ्यांची देखभाल आणि सुरक्षा वाऱ्यावर असते. वाहनांनी पुतळ्याला वेढा घातलेला राहत असताना याकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष आहे. सुभाषबाबूंच्या पुतळ्याची कित्येक वर्षांपासून रंगरंगोटीही करण्यात आलेली नाही. पुतळ्याच्या आत शोभिवंत आणि फुलझाडांचाही पत्ता नसून जंगली झुडपांचे पीक आले आहे. नागपूर मार्गालगत आरती चित्रपटगृह चौकात प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांचा पुतळा आहे. या पुतळ्यालाही वाहनांनी वेढा घातलेला असतो. पुतळ्याच्या समोर जड वाहने नेहमी मुक्कामी असतात. यामुळे अपघाताचाही धोका बळावला आहे. मात्र, वाहतूक पोलिसांवर ट्रकमालकांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे येथे नेमका पुतळा तरी कुणाचा, असा प्रश्न प्रवाशांना पडतो. पुतळा परिसराचे कित्येक वर्षांपूर्वी सौंदर्यीकरण करण्यात आले होते. वैविध्यपूर्ण दिवे लावण्यासोबतच कारंजे सुरू करण्यात आले होते. याशिवाय शोभेची झाडेही लावण्यात आली होती. मात्र, देखभालच केली जात नसल्याने अनेक झाडे जळाली असून सद्यस्थितीत कारंजेही बंद आहे. नियमित देखभालच केली जात नसल्याने पुतळ्यांना समस्यांनी ग्रासले आहे. शहरात विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. यामुळे अनेक पुतळे धुळीने माखले असताना पालिकेच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. पुतळ्यांच्या सौंदर्यीकरणासोबतच अतिक्रमणमुक्त करावे, पुतळ्यांची नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे.