पुतळ्यांचेही पालटले दिवस
By admin | Published: October 8, 2014 11:31 PM2014-10-08T23:31:37+5:302014-10-08T23:31:37+5:30
कोणत्याही निवडणुका म्हटल्या की राजकारणी डोकी चालू लागतात़ त्यातही राज्यासाठी महत्त्वाची निवडणूक यंदा होऊ घातली आहे़ निवडून येण्याकरिता वाट्टेल ते केले जाते़ याची प्रचिती सध्या पावलागणिक येताना दिसते़
विधानसभा निवडणूक : वर्षभर होते महात्म्यांकडे दुर्लक्ष
प्रशांत हेलोंडे - वर्धा
कोणत्याही निवडणुका म्हटल्या की राजकारणी डोकी चालू लागतात़ त्यातही राज्यासाठी महत्त्वाची निवडणूक यंदा होऊ घातली आहे़ निवडून येण्याकरिता वाट्टेल ते केले जाते़ याची प्रचिती सध्या पावलागणिक येताना दिसते़ प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून शेवटचे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत़ या पाच दिवसांत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची लगीनघाई उमेदवारांना करावी लागणार आहे़ यासाठीच जीवाचा आटापिटा केला जात असल्याचे दिसते़ प्रचाराच्या याच रणधुमाळीत विधानसभा मतदार संघांतील पुतळ्यांचेही दिवस पालटत असल्याचे दिसून येत आहे़
विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा मोठ्या प्रमाणात गरजू लागल्या आहेत़ १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून उमेदवारांना १३ आॅक्टोबरपर्यंतच प्रचार करता येणार आहे़ यामुळे पाच दिवसांतच सर्व उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्याची शिकस्त करावी लागणार आहे़ यामुळे उमेदवारांनी जमेल तेवढे कार्यकर्ते हाताशी धरून पायदळ वाऱ्या, रॅली, मोटर सायकल रॅली आदींद्वारे प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न करीत आहे़ यासाठी विविध ‘फंडे’ अवलंबिले जात आहेत़ कुणी शहरातील प्रत्येक गल्ली-बोळात फिरून मतदारांना आवाहन करीत आहेत तर कुणी व्यापाऱ्यांची साथ मिळते काय, हे तपासताना दिसत आहे़
याच काळात राजकीय पक्षांसह सर्वच उमेदवारांना शहरातील महात्म्यांच्या पुतळ्यांची आठवण होत असल्याचे दिसून येते़ थोर पुरूषांच्या आठवणी चिरकाल स्मरणात राहाव्या म्हणून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पुतळे बसविण्यात आले आहेत़ यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, झांशीची राणी यासह अन्य महात्म्यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे़ वर्षभर या पुतळ्यांकडे कुणी ढुंकून पाहत नाही़ संबंधित महात्म्याच्या जयंती, पुण्यतिथी दिनीच त्यांची स्वच्छता करून हार घातले जातात़
यानंतर मात्र सर्वच पुतळ्यांकडे दुर्लक्ष केले जाते़ विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महात्म्यांची प्रत्येकच उमेदवाराला आठवण होऊ लागल्याचे दिसते़ प्रचाराचे नारळ फोडताना एखाद्या महान पुरूषाच्या पुतळ्याला हारार्पण करीत अभिवादन केले जाते़ काही उमेदवार प्रचार रॅली काढताना पुतळ्यांना हारार्पण करतात़ प्रत्येकच निवडणुकीत हा प्रकार दिसतो़ यंदाही तो प्रकर्षाने समोर येत आहे़ शहरात विविध पुतळ्यांना उमेदवार हारार्पण करून हात जोडताना दिसतात़ यानंतर मात्र त्या पुतळ्यांकडे त्यांचेही दुर्लक्षच होते़