शिळ्या अन्नामुळे रस्त्यांवर दुर्गंधी
By Admin | Published: January 4, 2017 12:33 AM2017-01-04T00:33:50+5:302017-01-04T00:33:50+5:30
येथील वळणरस्त्याच्या दुतर्फा कचरा आणि कार्यालयात उरलेले शिळे अन्न टाकले जाते.
सेवाग्राम-पवनार रस्ताही दूषित : वळणरस्त्याच्या दुतर्फा टाकला जातो शहरातील कचरा
वर्धा : येथील वळणरस्त्याच्या दुतर्फा कचरा आणि कार्यालयात उरलेले शिळे अन्न टाकले जाते. यासह इमारत बांधकामाचा मलबाही येथे टाकण्यात येतो. हाच प्रकार शहराबाहेरील सेवाग्राम ते पवनार मार्गावर होत असून या रस्त्याचा ‘कचरा डेपो’ होत आहे. शिळे अन्न टाकल्याने या रस्त्याने जाताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. यावर प्रशासनाचा वचक नसल्याने येथे सर्रास कचरा आणि उरलेले अन्न टाकण्यात येत आहे. प्रवाशांना या रस्त्याने जाताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
पवनार ते सेवाग्राम या रस्त्याला ऐतिहासीक महत्त्व आहे. हा रस्ता सेवाग्राम रुग्णालयाला जोडतो. शिवाय पवनार येथील आश्रमाला जाण्याकरिता याच रस्त्याने जावे लागते. पवनार, सेवाग्राम आणि वरूड येथील नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र या रस्ताच्या दुतर्फा शिळे अन्न टाकण्यात येत असल्याने नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागतो. शिळे अन्न आणि कचरा येथे टाकल्याने कचऱ्याचे ढीग वाढले आहे. या रस्त्याच्याकडेला असलेल्या रिकाम्या जागांवर असे कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहे. वळणमार्गावर असाच प्रकार सुरू होता. काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत कचऱ्याची विल्हेवाट लावली. येथे अशी मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
ऐतिहासिक रस्ता झाला कचरा डेपो
पवनार ते सेवाग्राम मार्गाला ऐतिहासिक महत्त्व आहे. मात्र या रस्त्यावर ज्याप्रमाणे कचरा टाकला जात आहे त्यामुळे अल्पावधीत याला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त होत आहे.
येथे कचरा टाकण्यात आल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याचा परिसरातील मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. रुग्णांना या दुर्गंधीचा प्रचंड सामना करावा लागत आहे.
अन्नासोबत येथे प्लास्टीकचे द्रोण, थाळी, ग्लास येथे टाकण्यात येत असून त्यामुळे प्रदूषण होत आहे. हा कचरा विघटनशील नसल्याने येथेच सडून दुर्गंधी पसरते. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत असून ही बाब आरोग्याकरिता धोकादायक ठरत आहे.