खरांगणा-आर्वी मार्गासाठी चोरीच्या वाळूचा होतोय वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 05:00 AM2020-11-07T05:00:00+5:302020-11-07T05:00:12+5:30
पर्यावरण विभागाकडून परवानगी न मिळाल्याने जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव अद्यापही करण्यात आलेला नाही. अशातच काही वाळू तस्कर आपले एजन्ट नेमून चोरीची वाळू थेट बड्या कंत्राटदार कंपन्यांना चढ्या दराने विकत असल्याची माहिती आर्वीच्या महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यांना मिळाली. याच प्राप्त माहितीनंतर महसूल विभागाच्या पथकाने उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक यांच्या मार्गदर्शनात नाकेबंदी करून काही वाहनांची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खरांगणा (मोरांगणा) : खरांगणा-आर्वी मार्गाचे रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सध्या केले जात आहे. पण याच कामात चोरीच्या वाळूचा वापर होत असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर महसूल विभागाच्या चमून धडक कारवाई करून चोरीची वाळू घेवून जाणारे पाच टिप्पर व वाळू असा एकूण दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरूवारी रात्री उशीरा करण्यात आली.
पर्यावरण विभागाकडून परवानगी न मिळाल्याने जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव अद्यापही करण्यात आलेला नाही. अशातच काही वाळू तस्कर आपले एजन्ट नेमून चोरीची वाळू थेट बड्या कंत्राटदार कंपन्यांना चढ्या दराने विकत असल्याची माहिती आर्वीच्या महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यांना मिळाली. याच प्राप्त माहितीनंतर महसूल विभागाच्या पथकाने उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक यांच्या मार्गदर्शनात नाकेबंदी करून काही वाहनांची पाहणी केली. दरम्यान पाच टिप्पर मध्ये चोरीची वाळू नेली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी ही वाहने थांबवून पाहणी केली असता या अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळूचा भरणा असल्याचे आणि वाळूची वाहतूक करण्यासाठी कुठलीही परवानगी नसल्याचे पुढे आले. त्यानंतर ही पाचही वाळू भरलेली टिप्पर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईत वाळूसह तब्बल दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही चोरीची वाळू खरांगणा-आर्वी मार्गाच्या सिमेंटीकरणात वापरण्यात येणार होती असे महसूल विभागाच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे. ही कारवाई आर्वीचे उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, नायब तहसीलदार विनायक मगर, नायब तहसीलदार कदम, मंडळ अधिकारी यांनी केली.