दगडाने ठेचून इसमाची हत्या
By Admin | Published: March 22, 2017 12:37 AM2017-03-22T00:37:08+5:302017-03-22T00:37:08+5:30
शहरात मंगळवारी सकाळी एका युवकाची दगडाने ठेचून हत्या झाल्याचे उघड झाले आहे.
चार दिवसात दुसरी हत्या : दोन्ही घटनेत कारण गुलदस्त्यात
पुलगाव : शहरात मंगळवारी सकाळी एका युवकाची दगडाने ठेचून हत्या झाल्याचे उघड झाले आहे. सचिन महादेव पांडे (३२) रा. दखणी फैल असे मृतकाचे नाव आहे. आर्वी नाका परिसरात घडलेल्या या घटनेने शहरात चांगलीच खळबळ माजली माजली आहे. सचिनच्या हत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. या प्रकरणी रात्री उशिरा एकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
शहरात रविवारी पालिकेच्या शाळेतील चौकीदाराची हत्या करण्यात आली. या हत्येचा कुठलाही सुगावा पोलिसांना लागला नाही. यातच आज पुन्हा हत्या झाल्याने शहरवासीयांत चांगलीच दहशत पसरली आहे. दोन्ही हत्येचे कारण गुलदस्त्यात असून आरोपी फरार आहे.
पोलीस सुत्रानुसार, पुलगाव आर्वी मार्गावरील गुरांच्या दवाखान्याच्या प्रवेश द्वाराजवळ एका युवकाचा मृतदेह पडून असल्याची चर्चा गावात पसरली. माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी पाहणी केली असता मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला एक मोठा दगडही पडला असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तो दगड जप्त केला असून तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविला असल्याचे सांगण्यात आले आहे. या युवकाच्या डोक्याच्या मागील बाजूवर व चेहऱ्यावर दगडाने मारल्याच्या जखमा दिसून आल्या. यामुळे सदर युवकाची हत्या दगडानेच ठेचून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. प्रारंभी अनोळखी असलेल्या मृतकाचे नाव सचिन पांडे असे असल्याचे समोर आले. सचिन पांडे हा त्याच परिसरातील दखणी फैल येथील असून तो वाहन चालकाचे काम करीत होता. त्याचे वडील, एक भाऊ असा परिवार आहे. सूचना मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कोल्हे यांनीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या प्रकरणी तक्रारीवरून भदंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
मृतकाची अखेरची भेट गजू खोंडे (गजू) नामक युवकाशी झाल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. दोन-तीन दिवसांपूर्वी मृतकाचा काही युवकाशी जुगार खेळण्यावरून वाद झाल्याचे समजते. वाद झालेले काही युवक फरार झाले आहे. गत दोन दिवसात झालेल्या या दुसऱ्या हत्येमुळे शहरात भीती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी चौकीदार युवराज रामटेकेच्या मारेकऱ्याचा अद्याप पोलिसांना शोध लागला नसतानाच ही दुसरी हत्या झाली. (तालुका प्रतिनिधी)