रेशनकार्डसाठी तहसीलमध्ये ठिय्या
By admin | Published: January 25, 2017 01:01 AM2017-01-25T01:01:15+5:302017-01-25T01:03:05+5:30
शासनाने केसरी कार्ड धारकांना स्वस्त धान्य देणे बंद केले आहे. केवळ जमिनीचा सातबारा असल्यासह केशरी शिधापत्रिका देण्यात यावी,
वंचित ग्रामस्थांचे आंदोलन : जमीन नाही तर सातबारा आणणार कुठून
वर्धा : शासनाने केसरी कार्ड धारकांना स्वस्त धान्य देणे बंद केले आहे. केवळ जमिनीचा सातबारा असल्यासह केशरी शिधापत्रिका देण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय जुन्या शिधापत्रिकाही बाद ठरविल्या आहे. परिणामी, सातबारा नसलेल्या नागरिकांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. याविरूद्ध कुरझडी (जामठा) येथील वंचित ग्रामस्थांनी मंगळवारी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या प्रसंगी नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
केंद्र शासनाने केशरी कार्डधारक नागरिकांचा धान्य पुरवठा बंद केला. समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात; पण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्या योजनांचा गरजूंना लाभ मिळत नाही. आता शासनाच्या अजब निर्णयाचा गोरगरीब नागरिकांना फटका बसत आहे. शासनाने जमीन व सातबारा तसेच अपंगत्व असेल तरच केशरी शिधापत्रिका मिळतील, असा वटहुकूमच जारी केला आहे. या प्रकारामुळे गोरगरीब, भूमीहीन, हातावर आणून पानावर खाणाऱ्या नागरिकांना जगणे स्वस्त धान्य मिळेणासे झाले आहे. जुने कार्ड बाद केले असून नवीन कार्डही मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहे. कुरझडी येथील सुमारे ३० ते ४० गरजू कुटुंबियांकडे जुन्या शिधापत्रिका आहे; पण त्यांना सातबारा नसल्याने नवीन शिधापत्रिका मिळत नाहीत. यामुळे ते शासनाच्या स्वस्त धान्य योजनेपासून वंचित आहेत. दुर्बल घटकांना सवलतीच्या दरात धान्यसाठा मिळणे क्रमप्राप्त आहे. स्वस्त धान्य दुकानदारास विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या प्रकरणी योग्य कार्यवाही करीत कुरझडी (जामठा) येथील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शोषित जनआंदोलन आझाद युवा संघटन व ग्रामस्थांच्या ठिय्या आंदोलनता प्रवीण ढाले, दिनबाजी उघडे, नरेश चौधरी, सुरेश सोनटक्के, दशरथ राठोड, गलांडे, सुलोचना नलांडे यासह ग्रामस्थांनी सहभाग घेत व्यथा मांडल्या.(कार्यालय प्रतिनिधी)
केशरी कार्डधारकांना सरसकट वगळणे अयोग्य
केशरी, शुभ्र आणि पिवळे अशा तीन प्रकारच्या शिधापत्रिका शासनाकडून जारी केल्या जातात. शुभ्र रेशन कार्ड अंत्योदय, पिवळे बीपीएल तर केशरी कार्ड एपीएल धारकांना दिले जात होते. यातील बीपीएल व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नवीन कार्ड व धान्य साठा सुरळीत दिला जात आहे; पण एपीएल कार्ड धारकांचा धान्य पुरवठा बंद करण्यात आला आहे. आता तर गरीब असो वा नसो, सातबारा असेल वा अपंगत्व असेल तरच केशरी कार्ड व धान्य दिले जाईल, असा अफलातून निर्णय घेतला असून तो अयोग्य आहे.