अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसचा थांबा द्या
By admin | Published: April 20, 2015 01:48 AM2015-04-20T01:48:38+5:302015-04-20T01:48:38+5:30
परिसरातील प्रवाश्यांना अत्यंत सोयीची ठरणारी तसेच रेल्वे विभागाला भरपूर महसूल देऊ शकणारी अमरावती-जबलपूर ही एक्स्प्रेस येथील रेल्वेस्थानकावर थांबत नाही.
सिंदी (रेल्वे) : परिसरातील प्रवाश्यांना अत्यंत सोयीची ठरणारी तसेच रेल्वे विभागाला भरपूर महसूल देऊ शकणारी अमरावती-जबलपूर ही एक्स्प्रेस येथील रेल्वेस्थानकावर थांबत नाही. यामुळे प्रवाश्यांनाही त्रास होतो. या रेल्वेगाडीला सिंदी रेल्वे येथे थांबा द्यावा, अशी मागणी प्रवाश्यांतून होत आहे. याबाबत विद्यार्थी प्रवासी मित्र मंडळाचे सदस्य व भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले.
मुख्यमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांच्या या मागणीची त्वरित दखल घेत निवेदनाची प्रत रेल्वे व्यवस्थापक ओ.पी. सिंह यांच्या स्वाधीन केली. येथील सुमारे ६५० विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच सामान्य नागरिक दररोज वर्धा शहरात ये-जा करतात. सायंकाळी वर्धा येथून परत येण्याकरिता अमरावती-नागपूर पॅसेंजर ही एकमेव गाडी आहे. ही गाडी चुकल्यास वा शासकीय कार्यालय, न्यायालयातील कामे सहानंतरच पूर्ण होत असल्याने ही गाडी नागरिकांना पकडता येत नाही. यामुळे अमरावती-जबलपूर एक्सप्रेसचा थांबा सिंदी येथे द्यावा, अशी मागणी होत आहे. यासाठी गत दोन वर्षांपासून प्रयत्न होत आहेत. या प्रकरणी आता थेट मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालावे, अशी भूमिका आ. कुणावार यांनी घेतली.
जाम येथील कार्यक्रमातही विद्यार्थी प्रवासी मित्र मंडळाच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस आदींची भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते. यानंतर सादर केलेल्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. निवेदन सादर करताना प्रविण सिर्सीकर, ओमप्रकाश राठी, सुधाकर खेडकर, नीरज दुबे, गुल्लू भंसाली यांच्यासह भाजप व विद्यार्थी प्रवासी मित्रमंडळाचे पदाधिकारी हजर होते.(प्रतिनिधी)