मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:08 AM2018-06-23T00:08:33+5:302018-06-23T00:09:09+5:30

अनेक होतकरू तरुणांसह कामगारांनी कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी मिळेल तेथून कर्ज घेवून शहरातील मुख्य मार्गावर विविध खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत.

Stop the encroachment campaign on the main road | मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम थांबवा

मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम थांबवा

googlenewsNext
ठळक मुद्देआंबेडकरवादी एकता मंच व प्रहार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : अनेक होतकरू तरुणांसह कामगारांनी कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी मिळेल तेथून कर्ज घेवून शहरातील मुख्य मार्गावर विविध खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत. ही दुकाने अतिक्रमण करून लावण्यात आली असली तरी ती अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान उचलल्या गेल्यावर कसाबसा रोजगार मिळालेले तरुण व कामगार पुन्हा बेरोजगार होतील. परिणामी, मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात यावी, अशी मागणी आंबेडकरवादी एकता मंच व प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन ठाणेदारांच्या मार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात आले.
अनेकांनी कर्ज घेवून मुख्य मार्गावर व इतर ठिकाणी छोटे-मोठे व्यवसाय थाटले आहेत. पान टपरी, चहा टपरी, भाजी विक्री आदी व्यवसायातून हे तरुण व कामगार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत; पण २३ जूनला पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा गजराज अनेकांचा रोजगारच हिरावून घेणार आहे. यामुळे सदर होतकरू तरुणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बेरोजगारांची व होतकरू तरुणांची समस्या लक्षात घेता राबविण्यात येणारी अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात यावी. सर्वप्रथम या छोट्या व्यावसायिकांना स्थानिक नगर परिषदेच्या माध्यमातून व्यवसायासाठी जागा निश्चित करून देण्यात यावी, त्यानंतरच अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन नगरसेवक तथा आंबेडकरवादी एकता मंचचे संयोजक कुंदन जांभुळकर यांच्या नेतृत्त्वात पुलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांना देण्यात आले. शिवाय निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अभय शिंगाडे यांनाही सादर करीत त्यांच्या मार्फत सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. सदर मागणीवर वेळीच विचार करण्यात यावा, अन्यथा बळाचा वापर करून पूर्वी सारखा अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा आम्ही विरोध करू तसेच तीव्र आंदोलन करू, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना नगरसेवक कुंदर जांभुळकर यांच्यासह प्रकाश टेभुर्णे, करूणा टेभुर्णे, जमना खोडे, शोभा ठवकर, चंद्रकला डोईफोडे, प्रहार संघटनेचे नितीन बढे, राजेश सावरकर, तुषार वाघ, शैलेश सहारे, तुषशार कोंडे आदींची उपस्थिी होती. वाढती बेरोजगारी व तरुणांसमोर असलेले विविध आवाहने लक्षात घेवून योग्य कार्यवाहीची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशारा
अतिक्रमण हटाव मोहीम ही शहर विकास हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राबविल्या जात असली तरी या मोहिमेमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शहर विकासाला आमचा विरोध नाही; पण पूर्वी या छोट्या व्यावसायिकांना हक्काची जागा द्यावी नंतरच ही मोहीम राबवावी अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Web Title: Stop the encroachment campaign on the main road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.