जनतेच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:06 PM2018-12-16T23:06:15+5:302018-12-16T23:06:49+5:30
मागील सहा दिवसांपासून १४ गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर नळाला येणारे पाणी दुषीत राहत असून त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील सहा दिवसांपासून १४ गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर नळाला येणारे पाणी दुषीत राहत असून त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
सिंदी (मेघे)सह परिसरातील नागरिकांना सध्या दुषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. ही बाब नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने गंभीर आहे. परंतु, त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांसह ग्रा.पं. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त होताच त्याची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाहीसाठी निवेदन देण्यात आले आहे.
येत्या काही दिवसात नागरिकांची सदर समस्या निकाली न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना नितीन अमृतकर, कन्हैया यादव, आशीष धोबे, रजनीकांत ठाणेकार, अनिल देवतारे, नरेश राऊत, रैसुद्दीन शेख, शंकर पापल, राजु पोकळे, योगेश राखुंडे, पंकज वासेकर, प्रणय लोहवे, आकाश नारे, संदीप नागोसे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सिंदी (मेघे) येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.