महावितरणकडून दंड स्वरूपात होणारी लूट थांबवा
By admin | Published: June 29, 2016 02:11 AM2016-06-29T02:11:58+5:302016-06-29T02:11:58+5:30
महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांना विलंबाने बिल देऊन ते मुदतीत अदा करण्याचा आग्रह केला जातो.
मनसेचा मुख्य अभियंत्याला घेराव : अन्यथा नागरिक वीज बिल भरण्यास नकार देणार
हिंगणघाट : महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांना विलंबाने बिल देऊन ते मुदतीत अदा करण्याचा आग्रह केला जातो. यात ग्राहकांना मुदतीत बिल न भरता आल्यास सरासरी २० रुपये दंड आकारला जाते. ही जनतेची लूट असून दंड आकारणे बंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली. यासाठी मुख्य अभियंत्यांना शुक्रवारी घेराव करून निवेदन देण्यात आले.
घरगुती वीज ग्राहकांना विजेचे बिल दर महिन्याला मुदतीपर्यंत पोहोचविले जात नाही. बिल उशिरा मिळाल्याने मुदतीत देयकाचा भरणा करता येत नाही. यानंतर ग्राहकांवर सरासरी २० रुपये दंड आकारला जातो. यात ग्राहकांचा कसूर नसतो. वीज कंपनीच्या लेटलतिफ कारभारामुळे ग्राहकांकडून दर महिन्याला दंडाच्या स्वरूपात कोट्यवधीची रक्कम वसूल केली जाते. या मागे कंपनीचे षडयंत्र आहे. कंपनी ग्राहकांना वीज बिल उशिरा पोहोचविते. ही गरीब ग्राहकांची लूट आहे. ही लूट करण्यासाठीच वीज देयक उशिरा पोहोचविणे, मुदत कमी देणे, दंडाची रक्कम टक्केवारीने वाढविणे या बाबींची तरतूद कंपनीने केल्याचे दिसते. ही लूट थांबावी म्हणून ग्राहकांना त्यांचे वीज बिल किमान आठ दिवसांपूर्वी द्यावे, अन्यथा दंड आकारू नये. सदर बाबींची गंभीर दखल घेत कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून मनसेने केली.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, उपाध्यक्ष अमोल बोरकर, राहुल सोरटे, सचिव सुनील भुते, मनविसे शहराध्यक्ष राजू सिन्हा, डॉ. अशोक रेवतकर, लक्ष्मण सावरकर, गोमासे, ज्ञानेश्वर महाजन, नितीन भुते, देवेश कुबडे, जगदीश मुडे, नरेश चिरकुटे, गजानन कलोडे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)