सावंगी टी-पॉर्इंटवर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:02 PM2018-08-13T23:02:34+5:302018-08-13T23:03:02+5:30
धनगर समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे या मागणी साठी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीदिनी सरकारचा निषेध करीत शेकडोच्या संख्येत उपस्थित राहून धनगर बांधवांनी सावंगी (मेघे) टी-पॉर्इंटवर रास्तारोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : धनगर समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे या मागणी साठी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीदिनी सरकारचा निषेध करीत शेकडोच्या संख्येत उपस्थित राहून धनगर बांधवांनी सावंगी (मेघे) टी-पॉर्इंटवर रास्तारोको आंदोलन केले. व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आंदराजली वाहिलीे. या आंदोलनात मेंढपाळांनी आपल्या मेंढ्या सुध्दा रस्त्यावर आणल्या होत्या. या आंदोलनाचे नेतृत्व धनगर समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष जीतू गोरडे यांनी केले. तातडीने धनगर समाजास न्याय न दिल्यास यानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा सरकारला देण्यात आला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावंगी (मेघे)चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांच्यामार्फत निवेदन रस्त्यावरच देण्यात आले. या निवेदनात धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. मेंढपाळ व शेळीपालन करणाऱ्यांनी वनचराईच्या पासेस तातडीने देण्यात याव्या. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील मेंढपाळांवर २ जुलै रोजी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ते तातडीने मागे घेण्यात यावे. तेथील मेंढपाळांवर झालेल्या अन्यायाची तातडीने चौकशी करून वनविकास महामंडळाच्या प्रकल्पाधिकारी मोगरे व राळेगावचे पोलीस निरीक्षक खंदाडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे.
सरकारने न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरकारला देण्यात आलेला आहे. या आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते प्रा. राजू गोरडे यांनी आपल्या अधिकारासाठी व हक्कासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी आंदोलनास जनता दलाचे नेते प्रा. शिवाजी इथापे, युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, संभाजी ब्र्रिगेडचे मंगेश विधळे व तुषार उमाळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन धनगर समाजाच्या मागण्यास पाठिंबा जाहीर केला.
या आंदोलनाचे नेतृत्व विनायक नन्नोरे, योजना ढोक, पंचफुला बुरंगे, चिव्हाणे गुरूजी, कवडू बुरंगे, दशरथ भुजाडे, गोविंद पांगुळ, शुभम वैद्य, अंकित टेकाडे, आकाश पाठे, सतीश राऊत, नरेश पाटेकर, योगेश काळमे, नीलेश तालन, प्रदीप दाडे, भानुदास दाडे, एच.एम. गायनर, सखाराम कुलाल, चंदु शिंदे, बबन शिंदे, अंकुश शिंदे, शिवराम शिंदे, गुलाब शिंदे, संजय यादव यांनी केले.
आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौज फाटा होता. शांततामय मार्गाने आंदोलन पार पडले.
राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन
हिंगणघाट- धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीकरीता येथील धनगर समाजाच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर कलोडे भवन चौकात काही वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून आंदोलकांना हटवून वाहतूक सुरळीत केली.सदर आंदोलन लोकमाता अहिल्याबाई होळकर समाज जागृती मंडळाचे अध्यक्ष गणेश उगे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यांनतर आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांना विविध मागण्याचे निवेदन सादर केले. यात राज्यात धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतील ३६ व्या क्रमांकावर अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले आहे. परंतु याची अंमलबजावणी झालेली नाही.सोलापूर विद्यापीठला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नांव द्यावे, शासनाने धनगर समाजातील लोकांकरिता शेळी मेंढी वाटपाची योजना तयार करण्यात आली परंतु अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही, त्यामुळे योजना कुचकामी ठरली आहे. धनगर समाजाला शेळी मेंढी वाटप करण्यात यावे. विद्यार्थ्याकरिता प्रत्येक विद्यापीठ स्थळी ५०० मुला मुलीचे वसतिगृह स्थापन करावे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडी या जन्मस्थळी स्मारक उभारावे,आदी मागण्याचा समावेश आहे. आंदोलनात यादव भगत, रमेश घोडे, अनिल नाईक, संजय तुराळे, दिलीप बोभाटे,डब्लू.एन.पडवे, के.एच.शेंडगे, डॉ.संदीप लोंढे, रामभाऊ धवणे, संजय तुराळे, मधुकर भोयर, के.दा. ढेमसे,प्रवीण घुरडे, भारत लोंढे, प्रल्हाद तुराळे, निर्मल इसळ, देवराव गोहात्रे, संजय तुराळे, हरिचंद्र ढोले, दिलीप भगत, आशिष उघडे, शुभम तुराळे, ललित लांडे, कवडू शेळकी,धीरज खोंडे आदी उपस्थित होते.