रेल्वे उड्डाण पुलाकरिता रास्ता रोको
By Admin | Published: May 14, 2016 01:58 AM2016-05-14T01:58:03+5:302016-05-14T01:58:03+5:30
येथील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट नं. १४ वरील उड्डाण पुलाचे प्रलंबित बांधकाम तातडीने पूर्ण करण्यासाठी आम आदमी पार्टी व नगर विकास सुधार समिती,
३० जण स्थानबद्ध व सुटका : आश्वासनावर आंदोलकांची माघार
हिंगणघाट : येथील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट नं. १४ वरील उड्डाण पुलाचे प्रलंबित बांधकाम तातडीने पूर्ण करण्यासाठी आम आदमी पार्टी व नगर विकास सुधार समिती, हिंगणघाटच्यावतीने शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास निदर्शने करीत अर्धा तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे दुतर्फा वाहनाच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी पोहोचून डिसेंबरपर्यंत पुलाचे काम पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी ३० जणांना स्थानबद्ध केले व नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे ३० कोटी १० लाख रुपयांच्या बांधकामाचे कंत्राट विजयवाडा येथील के.व्ही.आर. इंजि. कंपनीला २०१० रोजी देण्यात आले. या कंत्राटनुसार दोन वर्षात पुलाचे बांधकाम करणे बंधनकारक असताना काम पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु २०१६ मध्येही पुलाचे काम जैसे थे स्थितीत आहे.
दिल्ली ते चेन्नई या वर्दळीच्या रेल्वे मार्गावरील हिंगणघाट रेल्वे स्टेशन लगतच्या गेट नं. १४ वरून रेल्वे प्रवासी व मालगाड्याचे आवागमन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे रेल्वे फाटक बंद झाल्यावर चार पाच गाड्याचे आवागमन झाल्यानंतर गेट उघडे होत असल्याने किंवा गेट बंद होण्याचे भीतीने वाहनांच्या धावपळीतून होणाऱ्या अपघाताची संख्या वाढीवर आहे. तसेच अरूंद रस्त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दिवसातून अनेकदा प्रभावित होते. या पुलाचे बांधकाम पूर्णत्वास न्यावे म्हणून अनेक विनंती अर्ज करण्यात आले. परंतु काम मात्र पूर्णत्वास आले नाही.
काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याचे आश्वासन
हिंगणघाट : शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रा. दिवाकर गमे व मनोज रूपारेल यांच्यासह शेकडो युवकांनी निदर्शने करून काही वेळ महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. राष्ट्रीय महामार्गाचे टेक्नीकल मॅनेजर आशुतोष पिंपळे, के.एन.जे. प्रोजेक्टचे ब्रिज इंजिनिअर विजय बोधनकर यांनी आंदोलनस्थळी पोहोचून उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्ते मनोज रूपारेल व प्रा. गमे यांच्याशी चर्चा करून डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होण्याचे आश्वासन दिले. मुदतीत काम पूर्ण न झाल्यास महामार्ग प्राधिकरणच्या नागपूर कार्यालयात धरणे आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. आंदोलनात प्रमोद जुमडे, प्रफुल्ल क्षीरसागर, राजू अर्गुले, दिनेश रूपारेल, कमलाकर बोकडे, भाऊराव काटकर, अशोक जुनानी, आशिष शर्मा, अक्षय मुपीडवार, शेखर जामुनकर, अनिल खैरे, संदेश थुल, शशीकांत गिरी, ताराचंद भोयर, बल्लू गुप्ता, जगदीश शुक्ला, कवडू साळवे, विनोद कुंभारे, राकेश नगरवार, अखिल धाबर्डे, संजय बावणे, जितेंद्र रूपारेल, भारत ठाकूर, राजू जोशी, कहीमभाई, राजेंद्र पचोरी, ग्वाल आचार्य यांना पोलिसांनी स्थानबद्ध करून सोडले.(तालुका प्रतिनिधी)