रेल्वेगाड्यांना थांबा द्या; अन्यथा रेलरोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:01 PM2019-07-11T22:01:48+5:302019-07-11T22:02:18+5:30
येथील रेल्वे थांब्यावर मागील सहा महिन्यांपासून नागपूर भुसावळ नागपूर, नागपूर अमरावती नागपूर व अजनी काझीपेठ अजनी या पॅसेंजर गाड्या थांबत नसल्याने विद्यार्थी, व्यापारी व सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे): येथील रेल्वे थांब्यावर मागील सहा महिन्यांपासून नागपूर भुसावळ नागपूर, नागपूर अमरावती नागपूर व अजनी काझीपेठ अजनी या पॅसेंजर गाड्या थांबत नसल्याने विद्यार्थी, व्यापारी व सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गाड्यांना १८ जुलैपर्यंत पुर्ववत थांबा द्यावा, अन्यथा रेल्वे रोको आंदोलन केले जाईल, असा निर्णय महादेव मंदिरात ओमप्रकाश राठी यांच्या अध्यक्षेतत झालेल्या विद्यार्थी प्रवासी मित्र मंडळाच्या सर्व बैठकीत घेण्यात आला.
सिंदी (रेल्वे) येथील रेल्वे स्थानकावरुन नागपूर आणि वर्धेकरिता जाणाऱ्या-येणाºया विद्यार्थी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांची मोठी संख्या आहे. मागील सहा महिन्यांपासून तिन्ही पॅसेंजर गाड्या बंद असल्याने शिक्षणाकरीत वर्धा आणि नागपुरला जाणाºया विद्यार्थ्यांना वेळेत महाविद्यालयात पोहोचता येत नाही. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच व्यापारी व सर्वसामान्यांनाही या बंद गाड्यांमुळे आर्थिक झळ सोसावी लागत आहे. या रेल्वे गाड्या १ जुलैपासून नियमित सुरु करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही या गाड्या सुरू केल्या नाही. त्यामुळे या रेल्वे गाड्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याकरिता विद्यार्थी प्रवासी मित्र मंडळाच्यावतीने बैठक आयोजित केली होती. ओमप्रकाश राठी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करुन प्रारंभी रेल्वे गाड्या सुरु करण्याच्या मागणी संदर्भात खासदार रामदास तडस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर कुणावार आणि रेल्वे प्रबंधक नागपूर यांना निवेदन द्यायचे. त्या निवेदनावर १८ जुलैपर्यंत काय कार्यवाही होते याची प्रतीक्षा करायची. जर १८ जुलैपर्यंत या रेल्वेगाड्या पुर्ववत सुरु झाल्या नाही तर रेल्वेरोको आंदोलन करण्याचे. या आंदोलनात विद्यार्थी, व्यापारी मंडळ, क्रीडा मंडळ तसेच सर्व राजकीय पक्ष आणि नागरिकांचा सहभाग घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला विद्यार्थी प्रवासी मित्र मंडळाचे अध्यक्ष देवीकिसन भन्साळी, आशिष देवतळे, डॉ. मधुकर कोल्हे यांच्यासह विद्यार्थी, व्यापारी व नागरिक उपस्थित होते.