वाई फाट्यावर मदतीच्या मागणीकरिता रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:27 PM2018-02-13T22:27:02+5:302018-02-13T22:27:21+5:30
पिंपळझरी व रोहणा येथील सकस आहार वस्तीतील गारपीटग्रस्तांनी वाई फाट्यावर मंगळवारी जि.प. सदस्य ज्योती गजानन निकम यांच्या नेतृत्वात आर्थिक मदत मिळावी म्हणून रस्ता रोको आंदोलन केले.
वाई-पिंपळझरी व रोहणा येथील सकस आहार वस्तीतील गारपीटग्रस्तांनी वाई फाट्यावर मंगळवारी जि.प. सदस्य ज्योती गजानन निकम यांच्या नेतृत्वात आर्थिक मदत मिळावी म्हणून रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी वाई फाट्यावर वाई, पिंपळझरी व रोहण्याच्या महिला पुरूष व युवक युवतींनी केलेल्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची माहिती मिळताच पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे चमूसह घटनास्थळी पोहोचले. बराच वेळ वाट पाहूनही महसूल विभागाच्या कोणत्याच अधिकाºयाने आंदोलन स्थळाला भेट न दिल्याने आंदोलनकर्त्यांनी महसूल विभागाचा निषेध व्यक्त करीत घोषणा दिल्या. प्रवाशांना त्रास होवू नये म्हणून आंदोलनकर्त्यांनी स्वत:ला अटक करून आंदोलन समाप्त केले. पोलीस प्रशासनाने जि.प. सदस्य ज्योती निकम, गजानन निकम, रोहण्याचे सरपंच सुनील वाघ यांच्यासह अनेक आंदोलकांना अटक करून पुलगावला नेले होते.