तलावातील काम थांबवा
By admin | Published: May 9, 2017 01:10 AM2017-05-09T01:10:22+5:302017-05-09T01:10:22+5:30
शहरालगच्या उमरी (मेघे) ग्रामपंचायतच्या हद्दीत कमळ तलावात काही पक्षांसाठी अधिवासाची जागा होती.
दोन ग्रामपंचायतींचा विरोध : सरपंचांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरालगच्या उमरी (मेघे) ग्रामपंचायतच्या हद्दीत कमळ तलावात काही पक्षांसाठी अधिवासाची जागा होती. जनहित मुक्तांगण प्रकल्पासाठी या अधिवासावरच जेसीबीचा घाला पडलेला आहे. त्यामुळे पाणपक्षी सैरभैर झाले आहेत. परिणामी, अधिवासाची शासन लेखी कमळ तलाव संरक्षीत पक्षी अधिवास अशी नोंद घेवून शांतता भंग होईल असे उपक्रम राबविण्यात येवू नये अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर निवेदन उमरी (मेघे)चे उपसरपंच सचिन खोसे, सिंदी (मेघे)चे प्रभारी सरपंच उत्कर्ष देशमुख यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. उमरी (मेघे) ग्रामपंचायतच्या हद्दीतील कमळ तलावाची जागा असली तरी ग्रामपंचायतीला पूर्णत: अंधारात ठेवून जिल्हा प्रशासन व जनहित मंच यांच्यामार्फत मुक्तागंण प्रकल्पाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. उमरी (मेघे) ग्रामपंचायतीने कमळ तलाव आतापर्यंत जोपासला. येथे दुर्मीळ पाणपक्षांचे आदर्श प्रजणनस्थळ निर्माण झाले. दुर्मीळ पक्षांचा सध्या विणीचा हंगाम सुरू आहे. अशाचवेळी येथे जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू करण्यात येते आहे. त्यामुळे त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. शासनाने लेखी कमळ तलाव संरक्षीत पक्षी अधिवास अशी नोंद करून पक्षी अधिवासाला शांतता भंग करणारे उपक्रम त्वरीत थांबविण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत उमरी (मेघे) व सिंदी (मेघे) यांनी केली आहे. सदर अधिवास धोक्यात आणण्याचे प्रकल्प राबविल्यास गेल्यास लोक चळवळ उभारण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या बाबींवर आक्षेप
आयटीआय टेकडी परिसरात सदर काम होत आहे. येथे बोटींग, पिकनिक स्थळ उभारण्यात येत आहे. त्यासाठी अभ्यासाविणाच सिमेंटीकरण होणार आहे. यामुळे या परिसरात सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या दैंनदिन जीवनावर परिणाम होणार आहे. एका खाजगी संस्थेला हे काम देण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून कारंजे, फुडस्टॉल, रंगमंच, व्यायामशाळा, योग केंद्र, पदपाथ उभारण्यात येत आहे. हा प्रकार ग्रा. पं. ला विश्वासात न घेता सुरू असल्याचे निवेदनात नमुद आहे.