वादळाचा तडाखा; लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 11:43 PM2018-06-01T23:43:34+5:302018-06-01T23:45:15+5:30
जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी वादळाचा चांगलाच फटका बसला. यात अनेक गावांतील घरांवरील छत उडाले. यामुळे अनेकांच्या घरांतील जीवनावश्यक वस्तू ओल्या झाल्याचे दिसून आले. या वादळात रसुलाबाद येथील कुक्कुटपाल केंद्राचे छत उडाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी वादळाचा चांगलाच फटका बसला. यात अनेक गावांतील घरांवरील छत उडाले. यामुळे अनेकांच्या घरांतील जीवनावश्यक वस्तू ओल्या झाल्याचे दिसून आले. या वादळात रसुलाबाद येथील कुक्कुटपाल केंद्राचे छत उडाले. यामुळे सुमारे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला. तर गिरड लगतच्या केसलापूर येथील घरांवरील छप्पर उडाले. शेकापूर (बाई), विरूळ आकाली येथील घरांवरील छप्पर उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले.
रसुलाबाद येथे वाऱ्यामुळे परिसरातील अनेक घरांवरील टीना कवेलू ताडपत्री उडून गेली. शिवाय येथील युवा शेतकरी सागर भोयर यांच्या शेतामधील कुक्कुटपालन केंद्राचा नवा शेड पुर्णत: उडाला. या छतावरील टीना उडून १ किमी अंतरावर जावून पडल्या. या वादळात केवळ छतच उडून गेले नाही तर भिंंतही पडली. यावेळी सागर भोयर केंद्रावर हजर असल्याने ते जखमी झाले. या शेडमध्ये सात दिवसाचे कोंबडीचे पिल्ले होते. ते जखमी झाले तर काहींचा या वादळात मृत्यू झाला. यात त्यांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले.
केसलापार येथे घर कोसळले
गिरड : परीसरात गुरुवारी सायंकाळी पावसासोबात आलेल्या वादळाने चांगलाच तांडव मचविला. या वाºयाने कित्येक झाडे, विजेचे खांब जमिनदोस्त झाले. यामुळे गिरड लगतच्या गावांचा विद्युत पुरवठा रात्रभर खंडीत झाला होता. केसलापार या गावात रात्री ८ वाजता वादळाने चांगलाच तांडव माजविला. या गावातिल वासुदेव मोघरे, कवडु मोघरे, हरिदास मोघरे, दिलीप धानोरकर, संजय बांगरे, सत्यभामा भोयर, शंकर भोयर, पंढरी भोयर, सुरेश भाबळे, नंदेश्वर लोहकरे, रामा कोसे, संभाजी सातपुडके, महादेव उके, शांताबाई सातपुडके यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले. तर गावातील प्रत्येक घराचे किरकोळ नुकसान झाले. अनेक घरावरील टिना छत उडून घरात पाणी शिरल्याने ठेवलेले धान्य, कपडे, आदिसह जीवनावश्यक सामग्रीचे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती तहसील कार्यालयाला देण्यात आली. तलाठी इकबाल अहमद शेख यांनी केसलापार येथील घरांच्या नुकसानीचा पंचनामा केला. पं.स. सदस्य लिलाबाई खुरपडे यांनी झालेल्या नकसानीची पाहणी केली. वादळात क्षतिग्रस्त घराच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.