सांस्कृतिक भवन अहिल्याबाई होळकर यांच्या शौर्याची गाथा ठरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 10:46 PM2019-07-01T22:46:22+5:302019-07-01T22:46:38+5:30
अहिल्याबाई होळकर यांंचा इतिहास नवीन पिढीला माहित व्हावा या भावनेतून आपण राज्यात ६५ ठिकाणी स्मारक बांधली असून बाराशे खेडातही अहिल्याबाई होळकराच्या नावाने लहान समाज मंदिरे बांधण्याचा आपला मानस आहे. आज या ठिकाणी ६५ लाख रूपये खर्चाचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सांस्कृतिक भवनाचे निर्माण होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : अहिल्याबाई होळकर यांंचा इतिहास नवीन पिढीला माहित व्हावा या भावनेतून आपण राज्यात ६५ ठिकाणी स्मारक बांधली असून बाराशे खेडातही अहिल्याबाई होळकराच्या नावाने लहान समाज मंदिरे बांधण्याचा आपला मानस आहे. आज या ठिकाणी ६५ लाख रूपये खर्चाचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सांस्कृतिक भवनाचे निर्माण होत आहे. सांस्कृतिक भवन त्यांच्या शौर्या व कार्याची गाथा ठरेल व नवीन पिढीला त्या स्मरणात राहील असे प्रतिपादन खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केले.
अयोध्या नगर नाचणगाव येथे डॉ. विकास महात्मे यांच्या स्थानिक विकास निधीतून ६५ लाख भवन बांधले जाणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. तर पं.स. सभापती विद्या भुजाडे, सरपंच अॅड. निलिमा राऊत, महाराष्ट्र ओ.बी.सी महामंडळाचे सरचिटणीस संजय गाते, पं.स. सदस्य दिलीप अग्रवाल, भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, जिल्हा सचिव नितीन बडगे, डॉ., संदीप धवले, महाराष्ट्र धनगर समाज संघटनेचे सरचिटणीस विनोद बरडे, जि.प. माजी सभापती मिलिंद भेंडे आदी उपस्थित होते.
खा. रामदास तडस म्हणाले ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सर्वकष दृष्टीकोण ठेवून राज्य केले. परंतु आज तोच धनगर समाज कित्येक वर्षापासून उपेक्षित आहे. या देशात ६० वर्षे कॉँग्रेसचे राज्य होते. परंतु धनगर समाज दुर्लक्षित राहिला. परंतु भाजपा सत्तेवर येताच धनगर समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटीचा निधी उपलब्ध करून दिला व समाजाच्या विकासाची दालने खुली करून दिली. इतकेच नव्हे तर अनेक वर्षापासून धनगर समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. डॉ. महात्मे व आपण स्वत: या मागणीचा पाठपुरावा करीत आहे. ही बाब केंद्र शासनाकडे असून यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका आहे. धनगर समाजाच्या हिताच्या अनेक योजना राज्य शासनाने अर्थसंकल्पात टाकल्या असून त्यासाठी निधीची तरतुद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अतिथींचा धनगर समाज नाचणगाव भाजपा यांच्यासह विविध संस्थातर्फे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प. सदस्य प्रविण सावरकर यांनी केले. पं.स. उपसभापती किशोर गव्हाळकर, धनगर समाज समितीचे महासचिव हरिष खुजे यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन रमेश निंबाळकर यांनी तर आभार प्रदर्शन सुधाकर गोरडे यांनी केले. कार्यक्रमास धनगर समाजाचे प्रभाकर ढोक, रायपुरे, अनिता ढोक, प्रेम साहू, भाजपा कार्यकर्ते यांचे मोलाचे योगदान होते. या कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याच्या विविध भागातील धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.