खासदार पुत्राच्या लग्नाची गोष्ट; वादावर अखेर ‘अंतरपाट’, फडणवीसांचा मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 08:51 AM2021-09-09T08:51:06+5:302021-09-09T08:51:43+5:30
सकाळी गाजले ‘ट्विटर वॉर’ अन् दुपारी उडाला ‘लग्नाचा बार’
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील भाजपच्या खासदार पुत्राने अत्याचार केल्याचा आरोप वर्ध्यातील एका युवतीने केला होता. यासंदर्भात नागपूर येथील पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर खळबळ उडाली. बुधवारी सकाळी या युवतीचा मदत मागणारा एक व्हिडिओ ‘ट्विटर’वरून शेअर करण्यात आला. मग लागलीच दुपारी खासदाररामदास तडस यांचे पुत्र पंकज आणि ती युवती दोघेही विवाहबंधनात अडकले.
वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचे सुपुत्र पंकज तडस यांनी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. वैदिक पद्धतीने विवाह करून मारझोड करून घराबाहेर हाकलून लावले, असा आरोप पूजा शेंद्रे नामक युवतीने केला होता. व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाचीही धावपळ उडाली. पूजा यांच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. त्यानंतर लागलीच विवाह करण्याच्या दृष्टीने घडामोडींनी वेग घेतला. वर्ध्यातील पांडे सभागृहात मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पंकज आणि पूजा यांचा वैदिक पद्धतीने विवाह सोहळा झाला. त्यानंतर दोघांनीही वर्धा नगरपालिकेमध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी प्रकरण दाखल केले. काही दिवसांपूर्वी रामनगर पोलिसांमध्ये दाखल केलेली तक्रारही पूजा मागे घेणार आहे. आता दोघांचाही संसार सुरळीत चालावा यासाठी शुभेच्छा असणार आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित असलेल्या तडस परिवारातील निकटच्या सदस्याने दिली.
रूपाली चाकणकर मदतीला धावल्या
संबंधित मुलीने बुधवारी एक व्हिडिओ जारी करीत आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्याकडे मदतीची याचना केली. या व्हिडिओची दखल घेत चाकणकर यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला. एवढेच नव्हे तर काही वेळातच पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांना पाठवून पीडितेला धीर दिला.
फडणवीसांचा समन्वयाचा सल्ला
n राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी जो व्हिडिओ ट्विट केला, त्या संदर्भात आपले खा. रामदास तडस यांच्याशी बोलणे झाले आहे.
n त्यांच्या मुलाचे व त्या महिलेचे रजिस्टर मॅरेज झाले आहे. त्यांना मी सल्ला दिला की, हा विषय समन्वयाने सोडवला पाहिजे. कायद्याचा कुठे अनादर होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.