जिल्हा कारागृहाचा अजब कारभार; जामीन मिळाला धाकट्याला सुटका केली थोरल्याची
By चैतन्य जोशी | Published: January 9, 2024 07:50 PM2024-01-09T19:50:48+5:302024-01-09T19:50:57+5:30
चूक लक्षात येताच कारागृह प्रशासनात खळबळ : पोलिसांचे फोन खणखणताच थोरल्यास केले ‘लॉकअप’
वर्धा: पेट्राेलपंपावरील तोडफोड करुन हॉटेलात सशस्त्र हल्ला केल्या प्रकरणात दोन भावंडे कारागृहात बंदिस्त होते. शनिवारी दोघांपैकी धाकट्या भावाचा न्यायालयातून जामीन मंजूर झाला. हमदस्त कारागृहात पोहचला मग काय, जिल्हा कारागृह प्रशासनाने कुठलीही शाहनिशा न करता चक्क थोरल्या भावाचीच सुटका केली. चूक लक्षात येताच खळबळ उडाली. धावाधव करुन पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. रामनगर पोलिसांनी ‘क्विक रिस्पॉन्स’ देत चुकीने सुटका झालेल्या थोरल्याची धरपकड करुन कारागृहात डांबले. त्यानंतरच कारागृह प्रशासनाने धाकट्या भावाची सुटका केली. या घटनेला रामनगर पोलिसांनीही दुजोरा दिला.
विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, शहरातील कारला चौकात असलेल्या पेट्राेलपंपासह एका हॉटेलावर सशस्त्र हल्ला चढवून रक्कम लूटली होती. ही घटना २६ जून २०२२ मध्ये घडली होती. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. तेव्हापासून सर्व आरोपी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
शनिवारी न्यायालयाने रवींद्रसिंग उर्फ कालूसिंग लखनसिंग जुनी याला शनिवारी ६ रोजी जामीन मंजूर केला. वकिलामार्फत हमदस्त कारागृहात पोहचला. कारागृह प्रशासनाकडून कालू जूनी याची सुटका करण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र, हे सर्व करीत असतानाच कारागृह प्रशासनाने रवींद्रसिंग उर्फ कालूसिंग जुनी याची सुटका न करता अटकेत असलेला त्याचा मोठा भाऊ राजेंद्रसिंग उर्फ गुड्डूसिंग लखनसिंग जुनी याची कुठलीही शाहनिशा न करता सुटका केली.
काही वेळानंतर हा गंभीर चूक कारागृह प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी थेट रामनगर पोलिसांशी संपर्क करुन घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी लगेच आरोपी गुड्डूसिंग जुनी यास अटक करुन कारागृहात डांबले त्यानंतरच रवींद्रसिंग उर्फ कालूसिंग जुनी याची सुटका करण्याची प्रक्रिया पार पडली. या घटनेने कारागृह प्रशासन आणि पोलिस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
कारागृह प्रशासनाकडून न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले जाते. ज्या व्यक्तीला सोडण्याचे आदेश दिले होते त्याच व्यक्तीला कारागृहाबाहेर सोडण्यात आले. अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही न्यायालयाशी संपर्क करा.-सुहास पवार, अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह.